Tuesday, March 31, 2020

पत्रकार संघटना व उमदी पोलीसांतर्फे गरिबांना अन्नधान्याचे वाटप

सोन्याळ,(वार्ताहर)-
       कोरोना विषाणुमुळे देशासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असून यामुळे शासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक उद्योग धंदे, छोटे-मोठे व्यवसाय, उद्योग, शेतमजूरी, बंद झाल्यामुळे हातावर पोट असणारे अनेक मजूरदार, कामगार, बेकार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उमदी व सुसलाद ता. जत येथील पारधी तांडा , मागुतकरी भाग व उमदी आणि परिसरातील गरिब कुटुंबांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जीवनावश्यक वस्तु आणि अन्नधान्य यामुध्ये प्रत्येकी कुटुंबास गहु , ज्वारी , तांदूळ , तेल , साबण ,साखर , चहापावडर आदी वस्तूंचे किट  देवून दिलासा देण्याचा एक छोटासा प्रयत्न  जत तालुका मराठी पत्रकार परिषद आणि उमदी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आला. या उपक्रमाचे उमदी परिसरातून कौतुक होत आहे.

डॉ . बलभीम मुळे स्मृती फाऊंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगाव येथील डॉ. बलभीम मुळे फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या साहित्यकृतींच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष लवकुमार मुळे यांनी घोषणा करताना सांगितले की, या उपक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १२५ साहित्यकृती आल्या होत्या. त्यांच्या लेखनाची शैली, मांडणी, विचारांची दिशा, अभिव्यक्तीचे स्वरुप तसेच पुस्तकांची बांधणी आणि सादरीकरण इत्यादी वैशिष्ट्ये पाहून पुरस्कार देण्यात आले आहेत.

सर्वांनी मिळून कोरोनाला पळवून लावू

पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे
सोन्याळ,(वार्ताहर)-
आजच्या घडीला संपूर्ण जग हे कोरोनामुळे भयभीत आहे. कोरोनाला अतितटीचा लढा देत आहे. आपल्या देशातसुद्धा या आजारामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीणप्रसंगी प्रशासन आपल्या परीने ठोस उपाययोजना करीत आहे. पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. पोलिस बांधव हे रात्रंदिवस रस्त्यांवर आपल्या संरक्षणासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत.

Monday, March 30, 2020

डफळापूरला प्रयास फाऊंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथे प्रयास फौंडेशन आयोजित रक्तदान शिबीर येथे भरवण्यात आले होते. यावेळी तब्बल 39 जणांनी रक्तदान केले, कोरोना विषाणू संक्रमण काळात ही रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.

'कोरोना प्रतिबंध' साठी जि. प. स्वीय निधी वापरावा

प्रकाश जमदाडे 
जत,(प्रतिनिधी)-
मास्क, सॅनिटायझर , जंतूनाशक औषध फवारणीसाठी व गोरगरीब जनतेसाठी जि.प.स्वीय निधी उपयोगात आणावा, अशी  मागणी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने व्याज दर कमी करावा

जत,(प्रतिनिधी)-
 नुकताच रिझर्व बँकेने एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की,  कर्जावरील तीन  महिन्याचे हप्ते  स्थगित ठेवणे तसेच कर्जावरील व्याजदर ही कमी करण्याबाबत  सदर निर्णय हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने आपल्याही बँकेच्या सभासदांना दिलासा देण्यासाठी  कर्जावरील व्याजदर कमी करावा, अशी मागणी शिक्षक सभासदांकडून करण्यात आले3 आहेत.

कोरोनामुळे मोलकरणींचे आर्थिक हाल

जत,(प्रतिनिधी)-
जतसारख्या शहरी भागात उच्चवर्गीय लोक धुण्या- भांडी, स्वच्छतेसाठी व स्वयंपाक करण्यासाठी मोलकरीण ठेवण्यात आल्या होत्या. त्या मोलकरीनाना कोरोना मुळे सुट्टी देण्यात आली आहे. काम नसल्याने मोलकरणींचे आर्थिक हाल होत आहेत. त्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

तुकारामबाबा यांच्याकडून मास्कचे वाटप

जत,(प्रतिनिधी)-
चिकलगी मठाचे मठाधिपती , समाजसेवक तुकाराम बाबा महाराज  यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले. येळवी येथील ग्रामपंचायती पासून तुकाराम बाबा महाराज यांनी मास्कच्या वाटपास सुरुवात केली.

गणेश बागडे यांच्याकडून गरीबांना साबण व हँडग्लौज वाटप

उमदी,(वार्ताहर)-
 जत तालुक्यातील उमदी खालील विठ्ठलवाडी येथे 'आपला माणुस पोलीस मित्र' संस्था (महाराष्ट्र राज्य) सांगली जिल्हा अध्यक्ष गणेश बागडे(दै.जनमतचे पत्रकार) व टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य विठ्ठलवाडी (उमदी) ता.जत जि.सांगली यांच्याकडुन गरीब कुंटूबाना मदत करण्यात आली.
गरीब कुटुंबांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे यासाठी  त्यांच्याकडुन डेटाॅल साबण,हाॅण्ड गोलज,बिसलरी पाणी बाॅटल वाटप करण्यात आल्या.

जत तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी केली गावबंदी

जत,(प्रतिनिधी)-
 कोरोनोंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागु केली आहे. दरम्यान शहरात गेलेले नागरीक गावी परत येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जत तालुक्यातील अनेक गावातील नागरीकांनी गावबंदी लागु केली आहे. पोलिस पाटलाच्या परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश नाकारला जात आहे.

के.एम. हायस्कूलचे प्राचार्य सय्यद यांना आदर्श सेवा पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
 जत येथील के. एम. हायस्कूलचे प्राचार्य रियाज सय्यद यांना सीबीएस न्यूजच्यावतीने राज्यस्तरीय 'आदर्श सेवा पुरस्कार' नुकताच सांगोला (जि. सोलापूर) येथे प्रदान करण्यात आला. या अगोदर लातूरच्या संस्थेकडून ज्ञानरत्न पुरस्कार मिळाला होता. सांगोला येथील सीबीएस न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांना पेट्रोल-डिझेल न देणाऱ्या पंपचालकांवर कारवाई करा

बसवराज पाटील                                              जत,
(प्रतिनिधी)-                                                           कोरोना प्रतिबंधित लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतीची कामे अडून राहिली असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने पेट्रोल -डिझेल देण्याचे आदेश देऊनही पेट्रोप पंप चालक तेल देत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.

Sunday, March 29, 2020

आमदार सांवत यांच्याकडून आरोग्य यंत्रणेसाठी 10 लाखाचा निधी

जत तालुक्यात सर्व यंत्रणा दक्ष
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात कोरोना विषाणु प्रभाव रोकण्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी आमदार निधीतून 10 लाख रूपयाचा निधी दिला आहे.तसे पत्र प्रशासनाला आ.सांवत यांनी आज रविवारी दिले.  या विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वोच्च खबदारी घ्या,कसल्याही परिस्थिती निधी कमी पडू देणार नाही,असे आश्वासन ही आ.सांवत यांनी प्रशासनाला दिले. देशामध्ये कोरोना या रोगाने थैमान घातले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तातडीने उपाय योजना करता याव्यात  यासाठी विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य तात्काळ उपलब्ध करून देता यावी, म्हणून राज्य सरकारने आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अतर्गंत 50 लाख रूपये पर्यंत खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उमदीत निर्जंतुकीकरण फवारणी

उमदी,( वार्ताहर)-
 कोरोणा विषाणुचा वाढता धोका लक्षात घेऊन उमदी ता.जत येथील सरपंच वर्षा निवृत्ती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी उमदी ग्रामपंचायतीने सतर्कतेची पावले उचलली आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे. तसेच सर्व दुकानदारास नोटीसा देत वेळेचे बधंन पाळा , शासनास सहकार्य करा अशा आशयाची नोटीस देखील काढली आहे.

कामगार सेना व जत लायन्स क्लबच्यावतीने पोलिसांना रुमाल वाटप

जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान माजवल्याने मानवजातीवर मोठे संकट ओढवले आहे. भारतात सध्या 900 चा आकडा पार केला असून सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात आहेत. याचीच खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी 24 तास आपले पोलिस प्रशासन व डाॅक्टर आपल्या साठी झटत आहेत.आपणही यांना सहकार्य करत घरी राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत व्हसपेठ कडुन नागरिकांना धान्य वाटप

 जत,( प्रतिनिधी)-
 कोरोणा विषाणूच्या धास्तीने सर्व मार्केट बंद असुन नागरिकांना अन्न धान्याचा तुटवडा भासत आहे अशी परिस्थिती आहे, हे लक्षात घेऊन व्हसपेठ  गावचे सरपंच राम साळुंखे व सर्व सदस्य मिळुन धान्य व  कांदा ,बटाटा अशा अन्नधान्याचे वाटप  करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच राम साळुंखे , सदस्य अंबाजी वगरे, मजिद भाई नदाफ, सुरेश सनदी ,  पंडितराव हुवाळे महाराज, ग्रा.पं शिपाई तसेच विनायक मनिमुले, प्रविण कांबळे  सचिन झेंडे पत्रकार इत्यादिंनी यावेळी कामात मदत केली. 

Saturday, March 28, 2020

साठ माणसांना घेऊन जाणारा कंटेनर जत पोलिसांनी पकडला


जत,(प्रतिनिधी)-
एका नामांकित कंपनीतील तब्बल 61 वाहन चालकांना घेऊन जाणारा कंटेनर जत पोलिसांनी काल (शनिवारी) सायंकाळी पकडला. हा कंटेनर सुरतहून कर्नाटकडे निघाला होता. या सर्व चालकांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची वैयक्तिक माहितींचे संकलन करण्यात आले असून त्यांची आरोग्य तपासणी होण्याची शक्यता आहेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जत शहरातही याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. अशा परिस्थितीत गुजरात राज्यातील सुरतहून कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या दिशेने निघालेला कंटनेर जत पोलिसांनी पकडला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

घरातून दारात, दारातून आत


घरात वेळ जाता जात नसल्याचा सूर; पोलिसांच्या दंडुक्याची भीती

जत,(प्रतिनिधी)-
घरातून दारात आणि दारातून घरात अशी अवस्था अनेक कुटुंबातील सदस्यांची संचारबंदीच्या निमित्ताने झाली आहे. घरात बसायचे तरी किती? वेळ जाता जात नाही, असाही सूर कानी पडू लागला आहे. दरम्यान फावल्या वेळेचा फायदा काही कुटुंबातील सदस्यांनी घ्यायला सुरुवात केली असून अडगळीत पडलेले कॅरम, बुद्धीबख चेस, पत्त्याचे कॅट आता बाहेर काढले गेले आहेत. कुटुंबांतील सदस्य यात रममाण झाली आहेत.

ऑनलाईन व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता


जत,(प्रतिनिधी)-
कोरोनामुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांबरोबरच उद्योजकांनाही दणका बसला आहे. आता यात सायबर गुन्ह्यांचाही झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे अनेकजण घरातून काम करत असल्याने सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना गंडा घालण्यासाठी बनावट संकेतस्थळ, विशिंग कॉल तसेच अफवा यांचा वापर सुरू असल्याच्या बातम्या मुंबई,पुण्याकडून येत आहेत. मार्च एंडसंबंधित आर्थिक व्यवहार व अन्य ऑनलाईन कामे करताना आता लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

दिलगिरी व्यक्त करीत आहोत

'जत तालुक्यात मद्य विक्री करणाऱ्या हॉटेलांवर छापा' या मथळ्याखाली आज जत न्यूज या पोर्टलवर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीत जत शहाराती *वृंदावन हॉटेल* चा उल्लेख आला आहे. मात्र सदर प्रकार या हॉटेलात घडला नाही. नजरचुकीने बातमीत नाव आले असून याबद्दल आम्ही *जत न्यूज परिवार* दिलगिरी व्यक्त करीत आहे. सदर बातमी आम्ही आमच्या पोर्टलवरून हटवली आहे. पुन्हा एकदा आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहे.

Friday, March 27, 2020

एकुंडी ग्रामपंचायतीच्यावतीने निर्जंतुकीकरण


जत,(प्रतिनिधी)-
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जत तालुक्यातील एकुंडी ग्रामपंचायत येथे सरपंच बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात आली.  ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून परगावाहून आलेल्या नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

हातावर पोट भरणाऱ्या मजूरांना त्वरित मदत द्या : जमदाडे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यामध्ये हातावरचे पोट असणारे अनेक लोक आहेत . त्यामध्ये सेंट्रींग कामगार , बांधकाम कामगार , पानपट्टी धारक , किरकोळ विक्रेते भाजीपाला उत्पादित करणारे छोटे शेतकरी यांचे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खूप नुकसान होत आहे . त्यांना किमान जगण्यासाठी तरी त्वरित मदत द्यावी, अशी  मागणी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व  पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

Tuesday, March 24, 2020

घरात राहूनच सुरक्षित, निरोगी गुढीपूजन करा

पुणे,(प्रतिनिधी)-
 गुढीपाडव्याच्या तयारीसाठी घराबाहेर पडून बाजारपेठेत गर्दी करण्याची आता गरज नाही. तुम्हाला घरातील वस्तू वापरूनदेखील गुढीपूजन करणे शक्य आहे. त्यामुळे घरात राहूनच सुरक्षित आणि निरोगी गुढीपूजन करता येणार आहे. राज्यात संचारबंदी असतानाही नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळते. घराघरांत बुधवारी (ता. २५) गुढीपाडवा साजरा करण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली तयारी हे देखील यामागील एक कारण आहे. यंदा कोरोनाचे सावट असताना मोठ्या थाटामाटात गुढीपाडवा साजरा करता नाही आला तरी कमीत कमी गोष्टींचा वापर करून गुढीपूजन करणे शक्य आहे.

Friday, March 20, 2020

जयसिंगपूर अपघातात उमदीचा युवक ठार

जत,(प्रतिनिधी)-
  शिरोळ येथे झालेल्या ट्रॅक्टर अपघातात उमदी येथील एक जण ठार झाला. भीमाशंकर चिदानंद ऐवळे  वय 20 रा. उमदी ता. जत जि. सांगली  असे ठार झालेल्या चे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मूळ उमदी येथे असणारे भीमाशंकर चिदानंद ऐवळे यांनी ऊस तोडणीसाठी दत्त साखर कारखाना मार्फत शिरोळ येथे ऊस तोडणीसाठी गेले होते.

Monday, March 16, 2020

के. एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक सय्यद यांना ज्ञानरत्न पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
 जत येथील के.एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक रियाज सय्यद यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या वतीने त्यांना मा. विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार २०२० देऊन गौरविण्यात आले.
नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षक साहित्य संमेलनात मुख्याध्यापक रियाज सय्यद  यांना पुरस्कार देऊन व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Saturday, March 14, 2020

मराठी साहित्य सेवा मंचच्या अध्यक्षपदी किरण जाधव

कार्याध्यक्षपदी मोहन माने पाटील
जत,(प्रतिनिधी)-
जत मराठी साहित्य सेवा मंचच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे पत्रकार व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष किरण जाधव यांची निवड करण्यात आली. शेगाव येथे पार पडलेल्या संस्थेच्या वार्षिक सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी अन्य कार्यकारणीही जाहीर करण्यात आली. संस्थेच्या  उपाध्यक्षपदी कवी रावसाहेब यादव, कार्याध्यक्ष पदी मोहन मानेपाटील,सचिवपदी रशीद मुलाणी, कार्यवाह म्हणून शिवाजी संकपाळ यांची निवड झाली आहे.

उटगी येथील उर्दू शाळेच्या वर्ग खोलीचे उदघाटन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उटगी येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या नवीन वर्ग खोली व  सीसॉ खेळणीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी पाटील, सरपंच भीमराया बिराजदार यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

Friday, March 13, 2020

जत तालुक्यात मिनी आगार होण्यासाठी प्रयत्न करू : दिनकर पतंगे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात आणखी एक मिनी आगार होण्यासाठी प्रयत्न करू,असे प्रतिपादन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी जत येथे केले. काल जत येथील एसटी महामंडळला महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे व जत तालुक्यातील काही शिवसैनिकांनी भेट देऊन तेथील एसटी व कामगारांच्या विविध अडीअडचणी प्रश्नांची माहीती घेतली. जत आगारातून पूर्वीप्रमाणे शिर्डी, बेळगाव, बेंगळूर,पणजी व कुडनूर या गाड्या सुरू कराव्यात यासाठी जत आगारप्रमुख श्री. व्होनराव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आगार प्रमुख श्री. व्होनराव यांनी जत एसटीची विविध अडीअडचणीची माहिती दिली व जत सारख्या पूर्व भागात एक मिनी डेपो झाला पाहिजे, अशी मागणी केली.

वाषाण शाळेचे विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे करण्यात आले होते.  या स्पर्धेत जत तालुक्यातील डफळापूर केंद्रातील वाषाण शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. 50×4 रिले लहान गट मुली या क्रीडा प्रकारात जिल्हात प्रथम येण्याचा मान पटकावला. यामध्ये कु.प्रिया दौलत पाटील, कु.निकीता विजय गडदे, कु.आरती आनंदा सरगर, कु. राजवी अनिल गडदे, कु. अंकिता भारत गडदे, कु. शितल संभाजी गडदे या विद्यार्थीनीनी सहभाग घेतला होता.

Monday, March 9, 2020

गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार - अजित पवार

पुणे,(प्रतिनिधी)-
कर्करोगासारख्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या गुटखा व त्या अनुषंगिक उत्पादनांवर शासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे. तथापि, अजूनही अवैध मार्गाने विक्री होतांना आढळून येत आहे. अशा अवैध मार्गाने गुटखा विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर शासन कठोर कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती येथील गिरिराज हॉस्पिटल आणि जैन सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान, शस्त्रक्रिया व किमोथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Sunday, March 8, 2020

जत शहरातील सोलनकर चौकातील अतिक्रमण हलविले

जत,प्रतिनिधी)-
 जत ते सांगोला या रस्त्याच्या कामाला गती आली असून काम जतजवळ आले आहे. हायवेच्या कामामुळे रस्त्याला अडथळा येणारी पानटपरी व खोकी आज हलविण्यात आली. याबरोबरच निवारा असलेले मोठे वृक्ष देखील पाडण्यात आले आहेत. जत शहरातील सोलनकर चौकात दोन मार्ग लागतात. एक विजापूर - गुहागर  व दुसरा सांगोला- ऐगळी. दोन्हीही मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. सांगोला - जत मार्गावरील जत शहराजवळचे काम राहिले होते. ते आता पूर्ण करण्यासाठी या  मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.

Saturday, March 7, 2020

जतच्या भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ

पाणी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
उमदी,(प्रतिनिधी)- 
   जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात  मनमानी  व  बेपर्वा  कारभारामुळे नागरिक हैराण झाले असून कर्मचाऱ्याचा  आढमुठी धोरणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. दिवसा-ढवळ्या आर्थिक लुबाडणूक होत असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कारभारात सुधारणा करावी अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा तालुका पाणी संघर्ष समितीने केली आहे.

मिरज शब्दांगणचे 'चैतन्य शब्दांगण' पुरस्कार जाहीर

शेगावच्या लवकुमार मुळेंचा समावेश
मिरज,(प्रतिनिधी)-
येथील शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ मिरज या संस्थेच्यावतीने साहित्य क्षेत्रातील विविध  साहित्यकृतीना देण्यात येणार्या पुरस्कारांची घोषणा  पुरस्कार निवड समितीने शनिवारी  जाहीर केली. स्व. प्रकाश कोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कथासंग्रहासासाठी देण्यारा येणारा पुरस्कार मुंबई येथील नारायण लाळे यांच्या काजवा कथासंग्रहाला तर स्व. अशोक कोरे यांच्या नावे देण्यात येणारा कादंबरीसाठीचा पुरस्कार जयसिंगपूर येथील डाॅ. सतीशकुमार पाटील यांच्या  मृत्यूस्पर्शला जाहीर करण्यात आला आहे. स्व.   चैतन्य माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा कवितासंग्रहासाठी कराडच्या अॅड. प्रमोद मोहिते यांच्या काळजापासून काळजापर्यंत या संग्रहास आणि स्व. विवेक माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार  माझ्या हयातीचा दाखला डाॅ. विशाल इंगोले (बुलढाणा) याना देण्यात आला आहे.

आसंगी शाळेतील दादासो गायकवाड 100 मी. धावण्यात जिल्ह्यात प्रथम

माडग्याळ,(प्रतिनिधी)-
सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आसंगी (जत) शाळेचा विद्यार्थी दादासो गायकवाड याने 100 मीटर धावणे या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आसंगी (जत) ला यश मिळवून दिले. या यशामुळे आसंगी (जत) शाळा आणि ग्रामस्थांमधून गायकवाड चे कौतुक होत आहे. या विद्यार्थ्याला क्रीडा प्रशिक्षक सुभाष हुवाळे यांच्यासह शाळेतील  इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळालेआहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या शिक्षकांचा सन्मान  करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावच्या नागरिकांनी अभिनंदन पर कार्यक्रम आयोजित केला होता.

Friday, March 6, 2020

आशा कर्मचाऱ्यांकडून फुकट काम करून घेणे बंद करावे


जत,(प्रतिनिधी)-
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने आशा कर्मचाऱ्यांकडून विना मोबदला काम करून घेणे बंद करावे व त्याना योग्य तो न्याय देण्यात यावा, या व अन्य मागण्यांसाठी सांगली जिल्हा लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन (citu) च्यावतीने जत तहसील कार्यालयासमोर  'जेलभरो आंदोलन' छेडण्यात आले. आशा कर्मचारीकडून कोणतेही काम विना मोबदला करून घेतले जाऊ नये, हे शासनाच्या तत्वाचे पालन होत नसल्याचे आज सर्रासपणे दिसून येत आहे.

म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील सर्व तलाव भरून घेण्याची शिवसेनेची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सर्व तलाव म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने भरून घ्यावेत आणि तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपवावा, अशा मागणी जत तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार डी.बी माळी यांना देण्यात आले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्याच्या पाण्याची टंचाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. काही गावांनी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे.

जनगणनेत लिंगायत धर्माची नोंद स्वतंत्र करा : सौ. मीनाक्षी आक्की

जत,(प्रतिनिधी)-
शासनातर्फे होणाऱ्या आगामी जनगणनेतील धर्माच्या स्वतंत्र कॉलममध्ये लिंगायत धर्म अशी नोंद करूनघ्यावी, तशा सूचना जनगणनेच्या प्रगणकांना देण्यात याव्यात, अशी मागणी माजी जि. प. सदस्या सौ. मीनाक्षी आक्की यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या,बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून लिंगायत धर्माची स्थापना केली आहे. देशात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गोवा आदी राज्यात लिंगायतला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा, त्याला सांविधानिक मान्यता मिळावी व अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा यासाठी अनेक आंदोलने झाली.

Thursday, March 5, 2020

मिरजेला 10 मार्च रोजी दिव्यांग साहित्य संमेलन

मिरज,(प्रतिनिधी)-
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर), शब्दांगण साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ (मिरज) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी 10 मार्च रोजी शहरातील रंगशारदा हॉलमध्ये एक दिवशीय दिव्यांग (अपंग) सन्मान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष सचिन पाटील आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे उपाध्यक्ष प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

संशयास्पद फिरणाऱ्या दरोडेखोरास जतमध्ये अटक

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरात मध्यरात्री दरोड्याच्या तयारी असताना रात्रीच्या गस्त पथकाला चार ते पाच सराईत गुन्हेगारी आढळून आले.दरम्यान पथकाने पाठलाग केला असता दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्यात एकाला पकडण्यात पोलीसांना यश आले तर अन्य चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.यात झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

सिध्दनाथ येथे विवाहितेची आत्महत्या

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सिध्दनाथ येथील विवाहिता रेखा सुनिल चौगुले (वय 25) हिने घरात कुणी नसताना घरातील लोखंडी हूकाला दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात पोलिस पाटील कांशीराम माने फिर्याद दिली आहे. घरगुती वादातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. आधिक तपास हवालदार हाक्के करीत आहेत.

व्हसपेट येथे राहत्या झोपडीस आग; लाखाचे नुकसान

जत,(प्रतिनिधी)-
व्हसपेट (ता.जत) येथे  बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास   राहत्या झोपडीस वीजवाहक तारांचे  शाँर्टसर्किट होऊन आग लागली.  गुलाब कोंडीबा हुवाळे यांची ही झोपडी होती. दररोज कामाला जाउन हे  हुवाळे दांपत्य आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाह करतात. रोजच्या प्रमाणे  ते कामाला गेलेले असताना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किट होऊन आग लागली, व बघता बघता या आगीने एक शेळी व काही कोंबड्या सह सर्व  संसारोपयोगी साहित्य  यांचा कोळसा झाला.

हार- तुरेला फाटा देत सातव- पाटील कुटुंबियांनी लग्नात दिले 251 हेल्मेट

जत,(प्रतिनिधी)-
पुणे येथील वाघोलीचे प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब सातव-पाटील यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यात जत तालुक्यात राबविला जाणा-या  मानव मित्र संघटना उपक्रमाला मदत म्हणून हार-तुरे यांचा डामडौल न करता 251 हेल्मेट भेट देण्याचा अनोखा उपक्रम सातव पाटील कुटुंबाने केला आहे.विधानसभा राष्ट्रवादी काॅग्रसचे पक्षप्रतोद आमदार अॅड अशोक बापू पवार यांच्या हस्ते गोंधळेवाडी (ता जत) येथील श्रीसंत बागडेबाबा मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांच्याकडे सपूर्द केले.

Wednesday, March 4, 2020

आईचा खून करणाऱ्या जतच्या युवकाला जन्मठेप

सांगली,(प्रतिनिधी)-
 किरकोळ कारणावरून आईचा विळ्याने वार करून खून करणाऱ्या किरण रायाप्पा बंडगे (वय २५, रा. बाज, ता. जत) किरण बंडगे या मुलास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंदाबाई रायाप्पा बंडगे मृत आईचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

शाळा, महाविद्यालयांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करा

सांगली,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारने १ मार्च पासून राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
तर राज्यातील सरकारी कर्मचारी यांना 5 दिवसाचा आठवडा केला; मात्र या निर्णयातून शिक्षकांना वगळण्यात आले. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून शिक्षकांना ही पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने त्यांनी केली आहे.

'जत तहसील कार्यालयासमोर 6 रोजी 'जेलभरो आंदोलन

जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन (citu) च्यावतीने जत तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी 'जेलभरो आंदोलन' छेडण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड हणमंत कोळी आणि कॉम्रेड मीना कोळी यांनी दिली आहे.

Tuesday, March 3, 2020

पतीने केला पत्नी आणि मेहुण्याचा खून

कोल्हापूर,(प्रतिनिधी)-
कौटुंबिक वादातून राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पतीने सुपारी कातरणाऱ्या अडकित्याने पत्नी आणि मेहुण्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंजाबाई कावणेकर (वय ४५), तिचा भाऊ केरबा हिवराप्पा येडके (४०, कोथळी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर  घडली आहे. मंजाबाईचा पती सदाशिव खानू कावणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मंजाबाई राशिवडे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या आहेत.

ऊसतोड मजुराची आत्महत्या

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील करेवाडी  येथील ऊसतोड मजूराने सोमवारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली.तुकाराम नामदेव करे (वय 25,रा.करेवाडी को.बो)असे आत्महत्या केलेल्या ऊस तोड कामगाराचे नाव आहे.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मुळ करेवाडी (कोंते बोबलाद)येथील ऊसतोड कामगार तुकाराम करे हा कुंटुबियासह सध्या डोंगराई परिसरात ऊसतोडीचे काम करत आहे.

संखच्या युवकाचा पुण्यात तरुणीने केला खून

लग्न करत नसल्याच्या कारणावरून गळा चिरला 
जत,(प्रतिनिधी)-
 लग्न करीत नसल्याच्या कारणावरून प्रेयसीनेच कोयत्याने गळा चिरून प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील नन्हे गावात मंगळवारी (ता.३) पहाटे चार वाजता घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद संख परिसरातही उमटले आहेत. आरोपी तरुणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली आहे.

Monday, March 2, 2020

'एलआयसी'च्या दोन नवीन योजना

जत,(प्रतिनिधी)-
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) दोन नवीन युनिटलिंक योजनांची घोषणा केली आहे. 'निवेश प्लस' आणि 'एलआयसीएसआयआयपी' अशा दोन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. 'निवेश प्लस' ही सिंगल प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, युनिटलिंक्ड अशी वैयक्तिक आयुर्विमा योजना आहे. पॉलिसीच्या काळात व्यक्तीला विमा संरक्षणासोबत गुंतवणुकीचा पर्याय दिला जातो. विमा घेणारी व्यक्ती किती रक्कम भरावयाची, याबाबत निर्णय घेऊ शकते. पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला पॉलिसी घेतेवेळी मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम ठरविण्याचीही सुविधा आहे.

जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली

जत,(प्रतिनिधी)-
जसजसा उन्हाचा तडाखा वाढतोय, तसतसा पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा दणका बसू लागला आहे. अनेक गावातून टँकरची मागणी येऊ लागली आहे. प्रशासनही पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आराखडा तयार करू लागले आहे. लवकरच पाण्याचे टँकर सुरू होतील असा अंदाज आहे. जत तालुक्यात दुष्काळाच्या आणि टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या पाऱ्याने पस्तिशी गाठली असून आता तो आणखी पुढे सरकत आहे. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील चौदा गावांना टँकर सुरू करावे लागतील,हे गृहीत धरून पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे.