Thursday, March 5, 2020

मिरजेला 10 मार्च रोजी दिव्यांग साहित्य संमेलन

मिरज,(प्रतिनिधी)-
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर), शब्दांगण साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ (मिरज) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी 10 मार्च रोजी शहरातील रंगशारदा हॉलमध्ये एक दिवशीय दिव्यांग (अपंग) सन्मान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष सचिन पाटील आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे उपाध्यक्ष प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
साहित्य क्षेत्रात सर्वसामान्यांप्रमाणेच दिव्यांग क्षेत्रातील मंडळीही कथा, कविता, कादंबरी, नाटक आदिसह विविध विषयात लिहीत असतात. यापैकी अनेक मान्यवर साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित झाले असून, त्यांनी लौकिकही मिळवला आहे. आपल्या आसपासच्या परिसरातील तसेच राज्यातील दिव्यांग साहित्यिकांचा सन्मान व्हावा, या हेतूने या विशेष संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात उद्घाटक, स्वागताध्यक्ष, संमेलन अध्यक्ष, कार्याध्यक्ष यासह सर्व सत्रांचे प्रमुख व सहभागी साहित्यिक ही दिव्यांग मंडळीच आहेत. हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे. सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग साहित्यिक मंडळींना निमंत्रित करण्यात आले असून जत तालुक्यातील शेगाव येथील महादेव बुरुटे, कडेगावचे चंद्रकांत देशामुखे, कोल्हापूरच्या सोनाली नवांगु ळ यांच्यासह अनेकांना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी जतच्या महादेव बुरुटे यांची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment