Sunday, March 1, 2020

विद्यार्थी ज्ञानाने, विज्ञानाने संस्कारशील झाला पाहिजे- प्रा.संतोष काळे

कडेगांव,(प्रतिनिधी)-
प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाने विज्ञानाने संस्कारशिल झाला पाहिजे. मानवी मूल्ये जोपासण्याचे शिक्षण दिले तरच भविष्यात निकोप समाज निर्माण होईल. यासाठी उपयोगी पडणारे ज्ञानाचे विज्ञानाचे सुसंस्काराचे व नवचैतन्याचे शिक्षण स्वामी विवेकानंद परिवारात मिळते असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ कवी प्रा. संतोष काळे यांनी काढले.

              ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कडेपूर (ता. कडेगाव) येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.टी. शिंगटे होते. यावेळी कडेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रुपाली यादव, ग्रा.पं. सदस्या सौ. उर्मिला यादव, सौ. सीमा यादव, प्रा. दत्तात्रय होनमाने, प्रा. के.एम.माने, प्रा. डॉ.एस.पी.शिर्के,  प्रा. गुलाब बागवान, प्रा.बापूराव पवार व प्रा. विठ्ठल पाटील प्रमुख उपस्थित होते.
                 प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद व सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन व संस्थेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य एस.टी. शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.सौ. शीला इंगवले यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक तर अहवाल वाचन प्रा.सौ.संगिता पाटील यांनी केले.
               जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा यशासाठी महत्त्वाची असते. आपल्यामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा आपणास कार्य करण्यास प्रवृत्त करीत असते. म्हणून आपण इतिहास वाचला पाहिजे, कारण इतिहासामधून थोरांच्या जीवन चरित्त्रामधून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे सांगून कवी प्रा. काळे पुढे म्हणाले की, निव्वळ परीक्षेत मिळालेले गुण महत्त्वाचे नसून आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता महत्त्वाची असते. गुणवत्ता असणारीच माणसे यशस्वी होतात. मानवी मूल्ये विसरून आपण स्वार्थाच्या मागे धावत आहोत म्हणून आज मानव आंतरिक समाधान हरवत आहे.आपणास आंतरिक समाधान हवे असेल तर आपण कलेची जोपासना केली पाहिजे. कारण कला ही माणसाला जगण्याचे बळ व समाधान देत असते, असे सांगून त्यांनी आपल्या पहाडी आवाजात अनेक कविता गाऊन  उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
                यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य एस. टी. शिंगटे म्हणाले की, पुस्तके ही आपल्या मनाचे भरण-पोषण करीत असतात. साहित्यिकांच्या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद असते म्हणून आपली मने आनंदी व श्रीमंत करायची असतील तर विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी मानवी कल्याणासाठी मानवतेच्या मूल्यांची जोपासना केली पाहिजे.
              यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पुस्तके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच महाविद्यालयातील प्रा. सतिश व्यवहारे यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये तर प्रा. सौ. विजया पवार यांनी मराठी या विषयामध्ये पी.एच.डी. ही पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा. अभिजीत दळवी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. राजेंद्र महानवर, प्रा. सुनिल खोत, प्रा. सुरज पाटील, प्रा.सौ.शीला इंगवले, परिचर सचिन माने, किरण भोंगळे व सांस्कृतिक विभागाने परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment