Saturday, March 28, 2020

ऑनलाईन व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता


जत,(प्रतिनिधी)-
कोरोनामुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांबरोबरच उद्योजकांनाही दणका बसला आहे. आता यात सायबर गुन्ह्यांचाही झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे अनेकजण घरातून काम करत असल्याने सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना गंडा घालण्यासाठी बनावट संकेतस्थळ, विशिंग कॉल तसेच अफवा यांचा वापर सुरू असल्याच्या बातम्या मुंबई,पुण्याकडून येत आहेत. मार्च एंडसंबंधित आर्थिक व्यवहार व अन्य ऑनलाईन कामे करताना आता लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शिवाय यात तपास तडीस जात नसल्याने लोकांचे मोठे नुकसान होत आहे. आता कोरोनामुळे अनेकांना सक्तीने घरात बसावे लागले आहे. काहीजण घरातूनच ऑनलाईन आर्थिक व्यवहार करत आहेत, याचा फायदा सायबर गुन्हेगार उठवताना दिसत आहेत. लोकांची फसवणूक कशाप्रकारे केली जाते, याची माहिती माध्यमांमधून सांगितली जात आहे. यातील पहिला प्रकार म्हणजे- बनावट ई-संकेतस्थळ- सध्या मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा असल्यामुले ई-कॉमर्स संकेतस्थळावरून त्यांची विक्री करत असल्याची माहिती अपलोड होत आहे. दैनिक सकाळच्या एका बातमीनुसार बाहेर अधिक भावात मिळणारे मास्क व सॅनिटायझर ऐवजी आरोपी कमी किमतीत मास्क उपलब्ध करत असल्यामुळे नागरिक सहज त्यांच्या जाळ्यात फसतात. माटुंग्यातील 38 वर्षीय व्यक्तीला व्हॉट्स अॅपद्वारे लिंक प्राप्त झाली होती. त्या लिंकद्वारा त्याने 100 मास्कची मागणी केली. त्या लिंकद्वारे तो पोहोचलेल्या संकेतस्थळावर त्याला बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आली. त्यानंतर त्याच्या खात्यातून 36 हजार रुपये काढण्यात आले.
सायबर गुन्हेगारीचा दुसरा प्रकार म्हणजे विशिंग कॉल- कोरोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे विशिंग कॉल करणारे आरोपी या परिस्थितीचा वापर करून सरकारी संस्था अथवा रुग्णालयांच्या नावाने दूरध्वनी करू शकतात. अशा परिस्थितीत बोलण्यात गुंतवून बँकेची माहिती घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अथवा लिंक पाठवून माहिती भरण्याच्या नावानेही बँकेची माहिती घेतली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राहण्याची आवश्यकता आहे.
फेसबूक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांवर पोलिसांची करडी नजर आहे. समाजातील काही विकृत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक समाज माध्यमांद्वारे यासंदर्भात मुद्दाम खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण करीत आहेत, असे उघडकीस आले आहे. त्यामुळे सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment