Sunday, March 1, 2020

ग्रामपंचायत शाळांचे वीज बिल भरण्यास करताहेत टाळाटाळ

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे वीज बिल ग्रामपंचायतीने भरावे,असा आदेश सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी काढला आहे. तसे पत्रही ग्रामपंचायतींना पाठवण्यात आले आहे. मात्र तरीही ग्रामसेवक शाळांचे वीज बिल भरण्यास नकार देत आहेत. एक प्रकारे ग्रामसेवकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
जत तालुक्यात 450 च्यावर मराठी,कन्नड आणि उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. काही मोजक्याच शाळांचे वीज बिल स्थानिक ग्रामपंचायती भरत आहेत, मात्र जवळपास 95 टक्के ग्रामपंचायती शाळांचे वीज बिल भरण्यास टाळाटाळ करत आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम1958 मध्ये कलम 45 नुसार गावातील शाळा,शिक्षण, आरोग्य, सामाजिक किंवा सांस्कृ तिक कल्याण याबाबतची कर्तव्य पार पाडण्याची तरतूद करण्यात आली आहे. कलम 45 च्या अनुसूची एकमधील 17 ते 21 मध्ये शिक्षण विषयक कामाचा समावेश आहे. त्यातील18-अ नुसार प्राथमिक शाळांना सुविधा पुरवणे,दुरुस्ती करणे या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वीज बिल अदा करू शकतात, असे स्पष्ट नमूद केले आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण देणे, शाळांची गुणवत्ता वाढवणे, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग शाळेत करणे, संगणकाचे ज्ञान देणे व अन्य विविध कामांसाठी शाळेत वीज असणे आवश्यक आहे. पण वीज बिल न भरल्याने शाळांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. वीज बिल शाळांना कमर्शियल झाल्यापासून शाळांचे वीज बिल भरण्यात न आल्याने गेल्या  काही वर्षांपासून शाळांमध्ये वीज नाही. त्यामुळे डिजिटल शाळांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. याचा परिणाम साहजिकच शाळांच्या गुणवत्तेवर झाला आहे. शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळांमध्ये वीज असणे आवश्यक आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. राऊत यांनी ग्रामपंचायतींना शाळांचे वीज बिल भरण्यास ग्रामपंचायतींना आदेश दिले असूनही वीज बिल भरले जात नाही. वीज बिल न भरणाऱ्या ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment