Monday, March 2, 2020

जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली

जत,(प्रतिनिधी)-
जसजसा उन्हाचा तडाखा वाढतोय, तसतसा पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा दणका बसू लागला आहे. अनेक गावातून टँकरची मागणी येऊ लागली आहे. प्रशासनही पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आराखडा तयार करू लागले आहे. लवकरच पाण्याचे टँकर सुरू होतील असा अंदाज आहे. जत तालुक्यात दुष्काळाच्या आणि टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या पाऱ्याने पस्तिशी गाठली असून आता तो आणखी पुढे सरकत आहे. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील चौदा गावांना टँकर सुरू करावे लागतील,हे गृहीत धरून पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
अंकलगी आणि गोंधळेवाडी गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचा अहवाल सादर झाला असून लवकरच टँकर सुरू करावे लागणार आहेत. दरम्यान, प्रशासनाने मार्चअखेर एक कोटी 64 लाखांचा टंचाई आराखडा तयार केला आहे.
यंदा तालुक्यात पाऊस चांगला झाला असला तरी मागच्या चार वर्षांत पावसाचे प्रमाण फारच प्रमाणात घटले आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने  घटत चालली आहे. जत तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी 450 मिलिमीटर इतके आहे. मात्र मागील चार वर्षांत सरासरी 250 च्या आसपास पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी रसातळाला गेली होती. यंदा चांगला पाऊस झाला असला तरी पाण्याची जमिनीतील पाण्याची पातळी फार वर आली नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
फेब्रुवारीच्या मध्यान्ह नंतर तालुक्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता.आता त्यात आणखी वाढ होत असून त्याचा फटका सर्वच स्तरावर जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळी लोक बाहेर पडताना दिसत नाहीत. सध्या पिके काढणीचा हंगाम सुरू असून मजूर व शेतकरी सकाळी लवकर शेतावर जात आहेत. उन्हाचा तडाखा वाढू लागल्यावर काढणी थांबवली जात आहे. तीच परिस्थिती बाजारात जाणवत असून दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत आहे.
दरम्यान, जत तालुक्यात 2020 मधील टंचाई आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.यामध्ये जानेवारी ते मार्चअखेर 14 गावे आणि 40 वाडयावस्त्यांवर टँकरची आवश्यकता भासेल असा अंदाज आहे.  तसेच एप्रिल ते जूनअखेर  तब्बल 23 गावे आणि 81 वाड्या- वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवावे लागणार आहे. यासाठी प्रशासनाने एक कोटी 64 लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. आता गावांनी टँकरची मागणी करायला सुरुवात केली आहे.
म्हैसाळ योजनेचे पाणी सोडा
दुष्काळाची आणि टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्याला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन जत तालुक्यातील मध्यम प्रकल्प, तलाव भरून घेतले जावेत, अशीही मागणी होऊ लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी  सभापती प्रकाश जमदाडे यांनी तशी लेखी मागणी खासदार संजय पाटील यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment