Tuesday, March 24, 2020

घरात राहूनच सुरक्षित, निरोगी गुढीपूजन करा

पुणे,(प्रतिनिधी)-
 गुढीपाडव्याच्या तयारीसाठी घराबाहेर पडून बाजारपेठेत गर्दी करण्याची आता गरज नाही. तुम्हाला घरातील वस्तू वापरूनदेखील गुढीपूजन करणे शक्य आहे. त्यामुळे घरात राहूनच सुरक्षित आणि निरोगी गुढीपूजन करता येणार आहे. राज्यात संचारबंदी असतानाही नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळते. घराघरांत बुधवारी (ता. २५) गुढीपाडवा साजरा करण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली तयारी हे देखील यामागील एक कारण आहे. यंदा कोरोनाचे सावट असताना मोठ्या थाटामाटात गुढीपाडवा साजरा करता नाही आला तरी कमीत कमी गोष्टींचा वापर करून गुढीपूजन करणे शक्य आहे.

दाते पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले, की यावर्षी गुढीपूजनाला साखरेची माळ, कडुनिंबाचा पाला मिळाला नाही तरी चालेल. अशा परिस्थितीत पारंपरिक पद्धतीऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र किंवा नवे वस्त्र बांधून गुढीपूजन करावे. कदाचित, काही घरांत काठी नसेल तर देवापुढे रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढूनसुद्धा पूजन करता येईल. हे पूजन करताना नवीन वर्षाचा संकल्प हा राष्ट्राच्या आणि विश्वाच्या आरोग्यासाठी मी स्वच्छतेचे, शिस्तीचे पालन करीन, असा करता येईल. त्यामुळे गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या किंवा बाजारात जाण्याच्या तयारीत असणान्या नागरिकांनी गुढीपूजनाच्या या पर्यायाचा नक्की विचार करावा, असेही दाते यांनी माध्यमांशी  बोलताना सुचविले आहे.

No comments:

Post a Comment