Friday, March 6, 2020

म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील सर्व तलाव भरून घेण्याची शिवसेनेची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सर्व तलाव म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने भरून घ्यावेत आणि तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपवावा, अशा मागणी जत तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार डी.बी माळी यांना देण्यात आले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्याच्या पाण्याची टंचाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. काही गावांनी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे.

यावेळी शिवसेनेचे नेते दिनकर पतंगे म्हणाले की, उन्हाळ्याची चाहूल लागताच जत तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या दोन गावांमधून टँकरची मागणी आली आहे. अंकलगी व गोंधळेवाडी या दोन गावांना टँकर देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. टँकर चालक पाच खेपा करण्या ऐवजी दोन- तीन खेपा करून शासनाची व नागरिकांची फसवणूक करताय. टॅंकरवर खर्च घालण्यापेक्षा कृष्णेचे पाणी तालुक्याला देण्यात यावे.  गेल्यावर्षी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्याला पाणी सोडण्यात आले होते. यावर्षीही जत तालुक्याला पाणी सोडण्यात यावे व तालुक्यातील सर्व तलाव भरून द्यावेत. सध्या जतला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या बिरनाळ तलाव पाणीसाठा अल्प असून काही दिवसांतच जत शहरालाही पाणी टंचाई जाणवणार आहे. आधीच शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येते. त्यामुळे त्वरित जत तालुक्याला म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पतंगे यांनी केली आहे. यावेळी जत तालुका पश्चिम भाग प्रमुख अधिकराव भोसले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment