Tuesday, March 3, 2020

संखच्या युवकाचा पुण्यात तरुणीने केला खून

लग्न करत नसल्याच्या कारणावरून गळा चिरला 
जत,(प्रतिनिधी)-
 लग्न करीत नसल्याच्या कारणावरून प्रेयसीनेच कोयत्याने गळा चिरून प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील नन्हे गावात मंगळवारी (ता.३) पहाटे चार वाजता घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद संख परिसरातही उमटले आहेत. आरोपी तरुणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली आहे.

महांतेश बिरादार (२७ वर्षे, मूळ रा. संख ता.जत जि.सांगली )असे खून करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुराधा करे (वय २४) सध्या रा. नन्हे, मूळगाव करेवाडी (जिल्हा सांगली) असे खून करणाऱ्या प्रेयसी तरुणीचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून महांतेश आणि अनुराधा यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये लग्न करण्याच्या कारणावरून वाद सुरू होते. महांतेश हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता. अशातच महांतेशने  आपण लग्न केल्याचे  तरुणीला सांगितले. त्यामुळे अनुराधा ही चिडून होती. याच कारणातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेमुळे जत तालुक्यातील संख परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment