Tuesday, March 3, 2020

पतीने केला पत्नी आणि मेहुण्याचा खून

कोल्हापूर,(प्रतिनिधी)-
कौटुंबिक वादातून राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पतीने सुपारी कातरणाऱ्या अडकित्याने पत्नी आणि मेहुण्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंजाबाई कावणेकर (वय ४५), तिचा भाऊ केरबा हिवराप्पा येडके (४०, कोथळी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर  घडली आहे. मंजाबाईचा पती सदाशिव खानू कावणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मंजाबाई राशिवडे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार हल्लेखोर सदाशिव यांने सुपारी कातरणाऱ्या अडकित्याने हा हल्ला केला. जखमीना नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात आणले. मात्र उपचारादरम्यान दोघाचा मृत्यु झाला. या घटनेने राशिवडे गावावर शोककळा पसरली आहे.
राशिवडे येथील दुहेरी खून प्रकरणातील मंजाबाई कावणेकर व केरबा येडके या बहीण-भावांचे मृतदेह ‘सीपीआर’मध्ये आणले. यावेळी नातेवाइकांनी अपघात विभागासमोर मोठी गर्दी केली. त्यापाठोपाठ भुयेवाडी, आजरा येथील सर्पदंश झालेले आणि विषप्राशन केलेले रुग्णही दाखल झाले. काही वेळाने उपचार सुरू असताना त्यांतील दोन रुग्ण दगावल्याने त्यांच्याही नातेवाइकांनी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. नातेवाइकांचा आक्रोश पाहून बघ्यांची गर्दी झाली. कोण कोणासाठी आला आहे, हे काहीच समजत नव्हते.
खून प्रकरणामुळे अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अनिल गुजर सीपीआर रुग्णालयामध्ये आले. बघ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदोबस्ताला असलेले पोलीस व सीपीआरच्या सुरक्षारक्षकांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर परिसर मोकळा झाला. या घटनांमुळे सीपीआर परिसरात तणाव पसरला होता.

No comments:

Post a Comment