Wednesday, March 4, 2020

शाळा, महाविद्यालयांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करा

सांगली,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारने १ मार्च पासून राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
तर राज्यातील सरकारी कर्मचारी यांना 5 दिवसाचा आठवडा केला; मात्र या निर्णयातून शिक्षकांना वगळण्यात आले. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून शिक्षकांना ही पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने त्यांनी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आ.पाटील यांनी नुकतीच शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी या विषयावर त्यांनी चर्चा केली. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायद्यातील परिपत्रकानुसार पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी एका शैक्षणिक वर्षात किमान 200 दिवस काम करणं व सहावी ते आठवीच्या शिक्षकांनी 220 दिवस काम करणे बंधनकारक असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
तसेच, सध्या शाळा व महाविद्यालये सोमवार ते शनिवार असे ६ दिवस सुरू असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर मुलांना व शिक्षकांनाही पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा, आणि शनिवार व रविवारी अशी सुट्टी दिली जावी. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देणे योग्य आहे, असे आमदार कपिल पाटील यांनी चर्चेत सांगितले.

No comments:

Post a Comment