Saturday, March 28, 2020

घरातून दारात, दारातून आत


घरात वेळ जाता जात नसल्याचा सूर; पोलिसांच्या दंडुक्याची भीती

जत,(प्रतिनिधी)-
घरातून दारात आणि दारातून घरात अशी अवस्था अनेक कुटुंबातील सदस्यांची संचारबंदीच्या निमित्ताने झाली आहे. घरात बसायचे तरी किती? वेळ जाता जात नाही, असाही सूर कानी पडू लागला आहे. दरम्यान फावल्या वेळेचा फायदा काही कुटुंबातील सदस्यांनी घ्यायला सुरुवात केली असून अडगळीत पडलेले कॅरम, बुद्धीबख चेस, पत्त्याचे कॅट आता बाहेर काढले गेले आहेत. कुटुंबांतील सदस्य यात रममाण झाली आहेत.

सकाळी उठल्यापासून दिवसभर नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 22 मार्चच्या एक दिवसाच्या जनता कर्फ्यूवेळी लोकांना घरातून बाहेर न पडणे फारसे अवघड गेले नाही, मात्र लॉकडाऊनचे दिवस जसे वाढू लागले आहेत तसे प्रत्येकाच्या चेहर्यावरची चिंता वाढू लागली आहे. एक तर इतके दिवस घरी बसून राहण्याची फारशी कुणाला सवय नाही. उद्योग, व्यापार, नोकरी-व्यवसाय, सर्व काही बंद असल्याने बाहेर पडूनही काही उपयोग नाही. सकाळ-संध्याकाळ बाहेर फिरायला जायचेही बंद झाले. या सगळ्यामुळे अनेकांची कोंडी होऊ लागली आहे. घरी बसून टीव्ही तर किती वेळ बघायचा? न्यूज चॅनल्स पाहावे तर कोरोना व्हायरसच्या बातम्यांशिवाय दुसरे काही पाहावयासच मिळत नाही. शिवाय बहुतांश सिरियल्सच्या शुटींग बंद झाल्याने पाहिलेले एपिसोड पाहावे लागत आहेत.
एका जागेवर बसून कंटाळा आल्यानंतर पुन्हा दारात येऊन बसायचे. दारात आल्यानंतर पुन्हा हाती मोबाईल, व्हॉट्स अॅपवरील मेसेज पाहिल्यानंतर पुन्हा तिकडच्या थोड्या गप्पा, रस्त्यावर कोणत्या चौकात पोलिसांनी कोणाला ठोकले याची चर्चा, दुपारचे भोजन आटोपल्यावर उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी गल्लीबोळात तसेच कॉलनीत थोडा सन्नाटा पसरतो. यात चूकून वीज पुरवठा खंडीत झालाच तर पुन्हा सगळे दारात नाही तर दाराच्या कट्ट्यावर. दुपारी तीन ते पाच या वेलेत गल्लीबोळात शांतता असते. पाचनंतर पुन्हा दारात चर्चेचा फड रंगतो. कसा तरी वेळ घालवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
मात्र काही कुटुंबात याचा सदुपयोग केला जात आहे. घरात कॅरम, पत्ते, बुद्धीबळ यांचे डाव रंगत आहेत. काहीजण घर उरकायला घेतले आहे. बरेच दिवस करेन करेन म्हणतो, अशी कामे पुरुषांनी हाती घेतली आहेत. काहीजण आपले पूर्वीचे छंद जोपासायला सुरुवात केली आहे. कुणी पुस्तके वाचतय, कुणी चित्रे काढायला घेतली आहेत. कुटुंबांसोबत किचनमध्येही आता पुरुष लुडबुड करीत आहेत.   

No comments:

Post a Comment