Friday, March 6, 2020

जनगणनेत लिंगायत धर्माची नोंद स्वतंत्र करा : सौ. मीनाक्षी आक्की

जत,(प्रतिनिधी)-
शासनातर्फे होणाऱ्या आगामी जनगणनेतील धर्माच्या स्वतंत्र कॉलममध्ये लिंगायत धर्म अशी नोंद करूनघ्यावी, तशा सूचना जनगणनेच्या प्रगणकांना देण्यात याव्यात, अशी मागणी माजी जि. प. सदस्या सौ. मीनाक्षी आक्की यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या,बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून लिंगायत धर्माची स्थापना केली आहे. देशात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गोवा आदी राज्यात लिंगायतला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा, त्याला सांविधानिक मान्यता मिळावी व अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा यासाठी अनेक आंदोलने झाली.
याची दखल घेवून कर्नाटक शासनाने न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अभ्यास करण्याची सूचना केली. त्यानंतर लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून त्याला सांविधानिक मान्यता मिळावी, असा अहवाल केंद्र शासनाला पाठविला आहे. महाराष्ट्र शासनाकडेही तसा पाठपुरावा सुरू आहे. लिंगायत धर्माची पूर्वी ब्रिटीश कालीन शासन दरबारात नोंद आढळते. परंतु स्वातंत्र्यानंतर या धर्माची स्वतंत्र जनगणना
झालेली नाही. धर्माची मान्यता काढून घेतली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेवून येणाऱ्या जनगणनेत लिंगायतांची नोंद धर्म या कॉलम मध्ये स्वतंत्र धर्म म्हणून व्हावा, त्यानुसार जनगणनेत लिंगायत धर्माची नोंद स्वतंत्र करा, अशी मागणी सौ. आक्की यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment