Tuesday, March 31, 2020

सर्वांनी मिळून कोरोनाला पळवून लावू

पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे
सोन्याळ,(वार्ताहर)-
आजच्या घडीला संपूर्ण जग हे कोरोनामुळे भयभीत आहे. कोरोनाला अतितटीचा लढा देत आहे. आपल्या देशातसुद्धा या आजारामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीणप्रसंगी प्रशासन आपल्या परीने ठोस उपाययोजना करीत आहे. पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. पोलिस बांधव हे रात्रंदिवस रस्त्यांवर आपल्या संरक्षणासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत.
आपला जीव धोक्यात घालून जराही मागे न सरता आपले राष्ट्रीय आणि नैतिक कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा आदर राखून त्यांना सहकार्य करा. त्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण करू नका. कोरोनाचे गांभीर्य ओळखून कोरोना व्हायरसचे संक्रमण व संसर्ग टाळण्यासाठी आणि या महाभयंकर विषाणूला आपल्या देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी वैद्यकीय सुविधा व अत्यावश्यक कामाशिवाय कृपया विनाकारण घरातून बाहेर पडू नका. आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण देशातील निष्पाप जनता संकटात येवू शकते. म्हणून नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे आणि संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळावे  व स्वतःच्या जिवाबरोबर इतरांचेही  जीव वाचवावे असे कळकळीचे आवाहन जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले आहे. ते सोन्याळ, जाडरबोबलाद, माडग्याळ येथे सरपंच,सदस्य व ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत बोलताना केले.
कोरोना व्हायरसच्या विश्वव्यापी महामारीच्या भयंकर पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील  लॉकडाऊनच्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांना जनतेने सहकार्य करावेत, लोकांना कोरोना विषयी जगातील आणि भारतातील सद्यस्थितीची माहिती समजावी आणि पोलिसांचे मनोधैर्य वाढवावे आणि नागरिकांकडून पोलिसांना चांगले सहकार्य मिळावे यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे आणि उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी जत पूर्वभागात संवेदनशील आणि  मोठ्या गावात जेष्ठ नागरिक,  ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, व ग्रामस्तरीय कोरोना कमिटीची बैठक घेऊन जनजागृती केली. यावेळी सोन्याळ येथे सरपंच संगीता निवर्गी, जकप्पा निवर्गी, सोसायटीचे  चेअरमन शिवगोंडा निवर्गी, सदस्य विजयकुमार बगली, लखन होनमोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल बिरादार, काडसिद्द काराजनगी,बसवराज बिरादार, श्रीशैल बिरादार, सैफद्दिन नदाफ, चिदानंद बिरादार,  मंडळ अधिकारी बुचडे, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार, गावकामगार तलाठी सौ. नुतून मोहकर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीशैल वळसंगकर, अशोक ऐवळे, उपस्थित होते.               
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जगदाळे म्हणाले की, नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे काही ठिकाणी पोलीस व नागरिकांमध्ये नाहक वाद होत आहेत. त्यामुळे पोलीसांना नाइलाजाने लाठीचा वापर करावा लागतो आहे. राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणारे पोलीस, डॉक्टर्स, व शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान व आदर करून त्यांना सहकार्य करावे. कुणीही घाबरून जावू नये. सरकार जे जे निर्णय घेत आहे ते आपल्याच हिताचे आहेत. शासनाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून अफवा पसरवणे धोकादायक आहे. लॉकडाऊन मध्ये विनाकारण बाहेर पडलेल्या काही बेजबाबदार टवाळखोर लोकांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेवू नये. या महाभयंकर परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाला व पोलीसांना सहकार्य केल्यास व कोरोनाला निश्चितच हद्दपार करू शकू.               
यावेळी एपीआय दत्तात्रय कोळेकर म्हणाले की,
 जीवनावश्यक वस्तूंची खरेदी किंवा काही महत्त्वाच्या अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास त्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेत तेही कुटुंबातील एकच सदस्याने बाहेर यावे. शासनाने घालून दिलेले नियम हे जनतेच्याच हितासाठी आहेत त्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास अशी वाईट वेळ येणारच नाही. पोलीस, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक शासकीय अधिकारी कर्मचारी हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या राष्ट्रीय संकटाचा सामना करण्यासाठी कंबर कसून काम करत आहेत. त्यांचा मान सन्मान करावा, त्यांना सुद्धा कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा आपण विचार केला पाहिजे. त्यांना कुटुंब सोडून घराबाहेर रस्त्यावर अहोरात्र राहण्याची हौस नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते जनतेच्या हितासाठी आपले राष्ट्रीय व नैतिक कर्तव्य बजावत आहेत. म्हणून आपण शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत आणि काटेकोर पालन करून कायद्याबाबत आदर ठेवला पाहिजे. शासन जे काही निर्णय घेत आहे ते सर्वकाही जनतेच्या हिताचेच आहे. म्हणून सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचा सामना घरात राहून केला पाहिजे. व स्वतः ला व आपल्या कुटुंबाला या विषाणूचा संसर्ग होण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोना विषाणूच्या विरूद्धची ही लढाई आपण जिंकून त्यावर मात करू शकतो. कोणत्याही अफवांना बळी पडू नका किंवा स्वतः अफवा पसरवू नका. लाॅकडाऊन तथा संचारबंदीचे नियम मोडू नका.

No comments:

Post a Comment