Friday, March 27, 2020

हातावर पोट भरणाऱ्या मजूरांना त्वरित मदत द्या : जमदाडे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यामध्ये हातावरचे पोट असणारे अनेक लोक आहेत . त्यामध्ये सेंट्रींग कामगार , बांधकाम कामगार , पानपट्टी धारक , किरकोळ विक्रेते भाजीपाला उत्पादित करणारे छोटे शेतकरी यांचे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खूप नुकसान होत आहे . त्यांना किमान जगण्यासाठी तरी त्वरित मदत द्यावी, अशी  मागणी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व  पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

जमदाडे म्हणाले, ऊसतोडीचा हंगाम संपलेला आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी गेलेले लोक गावाकडे परत येत आहेत. तसेच हातावरील पोट असणारे जवळपास 50 हजार कुटुंबे आहेत . त्यांना दररोजचे पोट भरण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू आहे त्यामुळे या गरीब लोकांचे अतोनात हाल होत आहेत. यासाठी खास बाब म्हणून अवर्षण प्रवर्ग तालुका व दुष्काळी असणाऱ्या जतसाठी विशेष पॅकेज देणे जरुरी आहे.
कामगारांना मार्चपर्यंत प्रति दिवस एक हजार  रुपये प्रमाणे भत्ता द्यावा किंवा प्रति मानसी 15 किलो तांदुळ व 15 किलो गहू द्यावेत. शेतकरी दुकानदार व सर्व कर्जदार यांना कर्ज व्याज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. छोटे - मोठे व्यापारी व उद्योजक यांचे जी. एस. टी. व इतर शासकीय देणी कार्यालयात भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी. कॅश क्रेडीट वाहन कर्ज ( बँका वित्तसंस्था किंवा फायनान्स ) इतर सर्व कर्जे व बचत गटाकडील कर्जे वसुलीस मुदतवाढ द्यावी, अशा मागण्या जमदाडे यांनी केल्या आहेत .

No comments:

Post a Comment