Saturday, March 28, 2020

साठ माणसांना घेऊन जाणारा कंटेनर जत पोलिसांनी पकडला


जत,(प्रतिनिधी)-
एका नामांकित कंपनीतील तब्बल 61 वाहन चालकांना घेऊन जाणारा कंटेनर जत पोलिसांनी काल (शनिवारी) सायंकाळी पकडला. हा कंटेनर सुरतहून कर्नाटकडे निघाला होता. या सर्व चालकांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची वैयक्तिक माहितींचे संकलन करण्यात आले असून त्यांची आरोग्य तपासणी होण्याची शक्यता आहेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जत शहरातही याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. अशा परिस्थितीत गुजरात राज्यातील सुरतहून कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या दिशेने निघालेला कंटनेर जत पोलिसांनी पकडला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
काहीतरी जीवनावश्यक वस्तू असेल असे पोलिसांना वाटले होते, मात्र अधिक तपासणी केली असता या कंटेनरमध्ये 25 ते 30 वयोगटातील 61 युवक आढळून आले. यामुळे काही काळ प्रशासनाची तारांबख उडाली. जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक आर. आर. शेळके, उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जत व उमदी पोलिस ठाण्याच्या अख्यारित तालुक्यातील सर्व मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत.
तालुक्यात येणार्या सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जत शहरात कर्नाटककडे जाणार्या कंटेनरची तपासणी केल्यावर वरील प्रकार उघडकीस आला. कंटेनर (केए 43- 4672) सह 61 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांची माहिती व चौकशी करण्याचे काम सुरू होते. नंतर आरोग्य व प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली.  No comments:

Post a Comment