Monday, March 30, 2020

जत तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी केली गावबंदी

जत,(प्रतिनिधी)-
 कोरोनोंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागु केली आहे. दरम्यान शहरात गेलेले नागरीक गावी परत येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जत तालुक्यातील अनेक गावातील नागरीकांनी गावबंदी लागु केली आहे. पोलिस पाटलाच्या परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश नाकारला जात आहे.

जत तालुका हा इतर तालुक्याच्या मानाने सर्वात मोठा व क्षेत्रफळ विस्ताराने जास्त असलेला आहे. जत तालुका हा कर्नाटक व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. कर्नाटक शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने सीमेवरील वायफळ व जाड्रबोबलाद या गावांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर खड्डा खणून बाहेरील वाहनांना गावात येण्यास अटकाव केला आहे. या गावातील नागरीकांनी झाडे तोडून सीमेवर रस्ता अडविला आहे. गोंधळेवाडी येथील ग्रामस्थांनी देखील ऊसतोडीवरून आलेल्या मजुरांना गावात येऊ दिले नाही. अगोदर कोरोना चाचणी करून 14 दिवसांनी गावात या, असे ग्रामस्थांनी ऊसतोड मजूर यांना सुनावले आहे.
भविष्यात ग्रामीण भागात कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी खबरदारी घेण्यास घेण्यास सुरुवात केली आहे. वायफळ व जाड्रबोबलाद गावांनी झाडे तोडुन रस्ता अडविला आहे.
कोरोनामुळे शहरात राहणे कठीण झाले असून आपला जुना गाव बरा असे म्हणून शेकडो युवक गावाकडे परतायला लागले आहेत. मात्र शहरात कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे शहरातून गावात येणाऱ्या व्यक्तीकडे ग्रामीण भागातील नागरिक संशयाने बघू लागले आहेत. संबंधित व्यक्तींची माहिती प्रशासनाकडे देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली जात आहे. तसेच गावातील लग्न तेरवी, वाढदिवस,
कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे, असे अनेक गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचानी सांगितले.

No comments:

Post a Comment