Monday, March 9, 2020

गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार - अजित पवार

पुणे,(प्रतिनिधी)-
कर्करोगासारख्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या गुटखा व त्या अनुषंगिक उत्पादनांवर शासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे. तथापि, अजूनही अवैध मार्गाने विक्री होतांना आढळून येत आहे. अशा अवैध मार्गाने गुटखा विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर शासन कठोर कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती येथील गिरिराज हॉस्पिटल आणि जैन सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान, शस्त्रक्रिया व किमोथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीनुसार जगामध्ये कर्करोग हा दुसर्‍या क्रमांकाचा आजार असून या आजारामुळे मोठ्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. हवामानबदल,आहारातील बदल तसेच ग्रामीण भागातून शहराकडे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. तथापि, कर्करोग झालेल्या रुग्णांनी घाबरु नये, वेळीच औषधोपचार घ्यावेत, रोज सकस व प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेता आरोग्य या विषयासाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता जागांची संख्या वाढविण्यात आलेल्या आहेत. जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहेत. नागरिकांनी शासनामार्फत देण्यात येणार्‍या विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
  कोरोनापासून वाचण्यासाठी अजितदादांचा दुरूनच नमस्कार
 डॉक्टर एकीकडे तुम्हीच सांगता हस्तांदोलन करू नका आणि तुम्ही हस्तांदोलन करण्याचा आग्रह करता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून केला नमस्कार केला. सध्या संपूर्ण जगात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी अजित पवार यांनी दुरूनच नमस्कार केला.  कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरिक करीत आहेत तिच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दाखविली. बारामतीत झालेल्या आज विविध कार्यक्रमांदरम्यान अजित पवार यांनी एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून नमस्कार करीत तुम्ही देखील असाच हात जोडून कोरोनोपासून बचाव करण्याचासाठी सल्ला उपस्थितांनी दिला,
उपमुख्यमंत्री झाल्याने मी काही वेगळा झालो आहे असे काहींना वाटेल पण डॉक्टरांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार करीत असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. बारामतीत डॉ. रमेश भोईटे यांनी आयोजित केलेल्या मोफत कर्करोग निदान शिबीराच्या उद््घाटन प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी हा खुलासा केला.

   

No comments:

Post a Comment