Sunday, April 12, 2020

... तर ३0 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवावा लागेल

मुंबई,(प्रतिनिधी)-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३0 एप्रिलपयर्ंतच लॉकडाऊन वाढवला आहे, परंतु नागरिकांनी लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले नाही तर कदाचित ३0 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून कर्मचार्‍यांना राहण्याच्या व्यवस्था करणार्‍या कंपन्या सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सूचित केल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातील रुग्णालयांची आता तीन विभागात वर्गवारी करण्यात येणार असून त्यानुसार व्यवस्था केली जाणार आहे. तसेच रॅपिड टेस्टनंतर आता पूल टेस्टिंगचा वापरही केला जाईल. राज्यात मुबलक प्रमाणात वैद्यकीय सुरक्षा साहित्याचा साठा आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार असून कोणताही कोरोना संशयित यातून सुटता कामा नये असा आमचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.
रुग्णालयांचे तीन  भागांत वर्गीकरण करण्यात येणार आहे.
लक्षणे नसलेले रुग्ण, कमी लक्षणे आणि गंभीर रुग्ण अशा तीन भागांत रुग्णालयांचे वर्गीकरण होईल. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये, सौम्य लक्षणांसाठी कोरोना हेल्थ, तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी असेल. मुख्यमंत्र्यांनी पूल टेस्टिंग संकल्पना मांडली. यात सोसायटी वा कुटुंबातील एका व्यक्तीची चाचणी घ्यायची. ती पॉझिटिव्ह आली तर सर्वांचीच चाचणी करण्यात येईल. यामुळे चाचणी घेण्याचा वेळ कमी होईल तसेच किटचीही बचत होण्यास मदत होईल. संपूर्ण देशात रेड, ऑरेंज व ग्रीन झोन राहणार आहेत. कोरोनाची १५ प्रकरणे म्हणजे रेड झोन, १५ पेक्षा कमी केस असल्यास ऑरेंज आणि ग्रीन म्हणजे एकही केस नाही, असे झोन तयार करून गाईडलाईन १-२ दिवसांत केंद्राकडून येऊ शकते.
राज्यात जास्त कोरोना चाचणी घेतल्यामुळे देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापयर्ंत राज्यात ३३ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबईतच १९ हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यात रुग्णांचा मृत्यूदर ५.५ टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment