Tuesday, April 14, 2020

शेतीसाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा

'स्वाभिमानी' चे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे
सांगली,(प्रतिनिधी)-
संपूर्ण जग ठप्प असताना बळीराजा मात्र रात्र दिवस जगण्या मरण्याची लडाई लढत आहे आजही त्याला जीवावर उदार होवून रात्रीच्या अंधारात शेतीला पाणी पाजावे लागत आहे राज्याची विजेची मागणी 10 ते 12 हजार मेगा वॉट नी कमी झाली आहे त्यामुळे शेतीला दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा अशी मागणी स्वाभिमानी चे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
खराडे म्हणाले, जगाला जगविणाऱ्या पोशिंद्याला 'दिवसा जागू द्या आणि रात्री झोपू द्या'. निदान या जागतिक महामारीच्या काळात तेवढा तरी दिलासा देण्याची भूमिका मायबाप सरकारने घ्यावी. अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा वीज पुरवठा केला जात नाही. शेतकऱ्यांना जीवावर उदार होवून रात्रीच्या अंधारात बॅटरीचा आधार घेवून विहीर, बोअर यांची बटणे दाबायला जावे लागते. अनेक शेतकऱ्यांकडे बॅटरीही नाही,अशी परिस्थिती आहे.
सध्या कोरोना मुळे पूर्ण राज्यात लॉक डाउन आहे. सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी कमी झाली आहे. राज्याला नेहमी 25 हजार मेगावॉट वीज लागते. पण उद्योग आणि व्यवसाय बंद असल्याने ही मागणी केवळ 13 ते 14 हजार मेगावॉट इतकीच आहे. म्हणजेच सुमारे 10 ते 11 हजार मेगावॉट विजेची मागणी कमी झाली आहे, तर सांगली जिल्ह्याची मागणी नेहमी 450 मेगावॉट इतकी असते. सध्या ती केवळ 250 मेगावॉट इतकीच आहे सुमारे 200 मेगावॉट वीज मागणी कमी झाली आहे. त्यामुळे लॉक डाऊनच्या काळात तरी शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी आहे.
काही ठिकाणी जंगली प्राणी शेतकऱ्यावर रात्रीच्या अंधारात हल्लेही करतात. अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे जीवही गमवावा लागला आहे. अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. सर्पदंश, विजेचा धक्का लागूनही अनेक शेतकऱ्यांनी रात्रीच्या अंधारात तडफडून जीव सोडला आहे. त्यामुळे  दिवसा शेतीला वीज पुरवठा करावा, अशी प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर सध्या कोरोना मुळे सर्व व्यवसाय, उद्योग बंद आहेत. मात्र शेती व्यवसाय बंद ठेवून चालणार नाही. कारण उद्या या संकटातून बाहेर पडल्यानंतर अन्नाशिवाय जग जगू शकणार नाही. तसेच सध्याचा भाजीपाला ही अंखंडीत राहण्यासाठी योग्य वीज पुरवठा आवश्यक आहे. या प्रश्नाबाबत माजी खासदार  राजू शेट्टी यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र यातून मार्ग निघाला नाही, तर या प्रश्नांवर महावितरणची बैठक घेवून तातडीने मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करत आहोत, असे श्री.खराडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment