Monday, April 13, 2020

20 एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये सशर्त सवलती दिल्या जाणार

3 मे पर्यंत देशात लॉकडाऊन:पंतप्रधान मोदी

देशातील कोरोना संसर्ग  परिस्थिती पाहता देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना आज केली. मात्र 20 एप्रिल नंतर काही गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या आठवड्याभरात लॉकडाऊन आणखी कठोर करण्याचेही सूतोवाच त्यांनी केले. नागरिकांनी सात नियमांचे कठोरपणे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्याला मदत करा, असे आवाहनही केले.
गेल्या महिन्यातभरातील लॉकडाऊनमुळे अनेकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले आहे.  काहींना खाण्याची  तर काहींना जाण्या- येण्याची समस्या निर्माण झाली. अनेकांना घरापासून दूर राहावे लागले,
पण तरीही  नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात कुठलीही कसूर केली नाही.
ते म्हणाले, सध्या देशात सर्वत्र सणांचा मोसम असतानाही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. देशात शंभर रुग्ण होण्याच्या अगोदरच परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली होती. देशात रुग्ण वाढण्याअगोदरच  म्हणजे 550 रुग्ण असताना देशाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. नागरिकांच्या  त्यागामुळे देशात कोरोनाला प्रतिबंध करण्यास मदत मिळाली आहे. यामुळे इतर देशाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे. इतर देशात 30 ते 35 टक्के रुग्ण वाढले आहेत. इतर देशाच्या तुलनेत भारतात कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
भारताला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असले तरी सोशल डिस्टनशिंग आणि लॉकडाऊन मुळे सर्वाधिक फायदा आपल्याला झाला आहे. सीमित संसाधने असतानाही  सर्वांनी जबाबदारीने काम केले, असे सांगून मोदी म्हणाले, लोकांना कमीत कमीत त्रास होईल, अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. पुढचा आठवडा लॉकडाऊन  आणखी कठोर करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पंतप्रधान मोदी यांनी केले.
आपल्या परिसरात हॉटस्पॉट वाढणार नाही, याची जबाबादारी सर्वांची असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, येत्या आठवड्याभरात प्रत्येक गाव, शहर यांचे परीक्षण  केले जाणार आहे. त्यानंतर परिस्थिती सुधारलेल्या परिसरात सशर्त सवलती दिल्या जातील. स्वतः लापरवाही करू नका आणि दुसऱ्या कुणाला करू देऊ नका. उद्या विस्तृत गाईडलाईन दिली जाईल. रोजच्या कमाईतून आपली जीविका करणाऱ्या मजूर, कामगारांच्या  अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्या हिताचा विचार केला जाईल.
शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतली जात आहे.  सप्लाय चैनच्या समस्या दूर केल्या जात आहेत.
कोरोना संसर्ग झालेल्या 10 हजार रुग्णांसाठी  1500 बेडची आवश्यकता असते. मात्र आपल्याकडे 1 लाख बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. खास कोविड-19 साठी रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे. अजूनही प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नियमांचे कठोर पालन करा, असे सांगतानाच त्यांनी सात नियम सांगितले. त्याला त्यांनी सप्तपदी म्हटले आहे. ही सप्तपदी आपल्याला विजयाच्या मार्गाकडे नेणार आहे, असेही मोदी म्हणाले.
कोणते ते सात नियम
1) आपल्या घरातील  बुजुर्ग आणि आजारी माणसांची  अधिक काळजी घ्या.
2) लॉक डाऊन आणि सोशल डिस्टनसन या 'लक्ष्मण रेखे'चे  पूर्ण पालन करा. मास्कचा वापर अनिवार्य करा.
3) प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाययोजना करा. उदाहरणार्थ गरम पाणी, औषधी काढा प्या.
4) आरोग्य सेतू ऐप  जरूर डाऊनलोड करा.इतरांना डाऊनलोड करण्यास प्रोत्साहित करा.
5) आपल्या परिसरातील गरिबांची देखरेख करा. त्यांना अन्न धान्याची, गरज असलेल्या वस्तूंची मदत करा.
6 ) व्यवसाय,उद्योग  असलेल्या नागरिकांनी संवेदना बाळगून आपल्या कामगारांना मदत करा. त्यांना  नोकरीतून काढून टाकू नका.
7) कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस यांचा सन्मान करा. त्यांचा आदर करा.

No comments:

Post a Comment