Wednesday, April 8, 2020

शिक्षकांचे वेतन पडणार लांबणीवर?

जत,(प्रतिनिधी)-
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच विभागातील अधिकारी-कर्माचारी यांचे मार्च महिन्याचे पगार झालेले नाहीत. आता त्यातच  या सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे पगार दोन टप्प्याअंमध्ये देण्याचा निर्णय झाल्याने पगार बिले पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा पगार एप्रिल अखेरपर्यंत होण्याची शक्यता कमीच आहे.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आयकर कपात घातल्याने आधीच कर्मचाऱ्यांना पगार कमी मिळाला आहे. आता या महिन्यात 50 ते 25 टक्के पगार कपात होऊन सरकारी कर्मचाऱयांच्या हातात मिळणार आहे. त्यामुळे याआधीच अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यातही आर्थिक गणिताचा फटका बसणार आहे. सरकार आर्थिक अडचणीत असताना पगार मागणे सोयीस्कर वाटत नसले तरी अनेकांनी मार्च 2020 महिन्याचा पगार पूर्ण महिन्याचा द्यावा व एप्रिल चा पगार दोन टप्यात द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
 सध्या राज्यभर पगाराचा पत्ता नाही.  कारण आपल्याला माहीत आहे. कोरोनाचं संकट सगळ्या जगावरच आहे. भारतही मुक्त नाही. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ज्या राज्यावर निर्भर आहे तो महाराष्ट्र आणि मुंबईही मुक्त नाही.  शासनाने एप्रिल महिन्यात दिला जाणारा मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात देणार आहे. वेतन कपात नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मात्र  शिक्षकांच्या पगारात 25 टक्के ची कपात होणार आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र 100% पगार मिळेल. अर्थात हा निर्णय उशिरा लागू झाल्यामुळे पगाराची बिलं गेली होती. या महिन्याचा पगार आहे त्या बिलानुसार द्यावा. पुढच्या महिन्यात टप्प्याची अमंलबजावणी करावी. असं पत्र काही आमदारांनी शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.
मंत्रालयातून सांगण्यात आले आहे की, राज्यात कोणत्याच कर्मचाऱ्याचा पगार शासनाने दिलेला नाही. सगळ्यांचेच पगार उशिरा होणार आहेत. अगदी आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस यांनाही एक रुपया दिलेला नाही. त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं, असेही आवाहन करण्यात आले आहे. तिजोरीत पैसेच कमी आहेत. संकट मोठं आहे त्यामुळे अडचण मोठी आहे.  अगोदरची पगार बिले माघारी घेऊन पुन्हा दोन टप्प्यात पगार दिले जाणार आहेत. 10 तारखेपर्यंत शालार्थ आणि सेवार्थ सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ह नवीन बिलं तयार करून सादर कऱण्यात येणार आहे.
नवीन बिलं तयार करण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत.  लॉकडाऊनमुळे कर्मचारी शाळेत जाऊ शकत नाहीत ही अडचण आहे.
मुंबईच्या बाहेर जे राहतात त्यांची खूप अडचण आहे. 15 तारखेनंतर लॉकडाऊन उठला की त्यांना येता येईल आणि नवीन बिलं सादर करता येतील. ते झाल्यानंतर यंत्रणेने लवकरात लवकर बिलं पास करण्याचं मान्य केलेलं आहे. पण त्याला सुद्धा किमान आपल्या नेहमीच्या प्रोसिजरनुसार 8 ते 15 दिवस लागतात. त्यामुळे एप्रिल महिन्यात मार्च महिन्याचा पगार होण्याची शक्यता कमीच आहे.


No comments:

Post a Comment