Tuesday, April 14, 2020

सरसकट सर्वच रेशनकार्डधारकांना मोफत धान्य योजनेचा लाभ द्या

चिदानंद तेली
सोन्याळ,(वार्ताहर)-
सध्या तीन महिन्यापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न
योजनेअंतर्गत दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभ  मिळण्यासाठी अनेक केशरी रेशन कार्डधारक शासनाच्या काही निकषांमुळे पात्र ठरत नाहीत. त्यामुळे जत  तालुक्यातील हजारोंच्या संख्येने गरजू नागरिक मोफत धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना सरसकट सर्वच रेशन कार्डधारकांना मोफत धान्य योजनेचा लाभ द्यावा. तसेच स्थलांतरित मजूर आणि ज्या नागरिकांकडे रेशन कार्डच नाहीत.अशाही वंचित नागरिकांनासुद्धा मोफत आणि सवलतीच्या दरात (२ रुपये गहू ३ रुपये तांदूळ) धान्य योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी सोन्याळचे माजी उपसरपंच चिदानंद तेली यांनी केली आहे. 
सध्या संपूर्ण विश्वात कोरोना आजाराने थैमान घातले असून या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे संपूर्ण  गोरगरिबांना जनतेच्या रोजगारावर गदा आली असून जवळपास सर्वांनाच  उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. केंद्र  शासनामार्फत दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ या सवलतीच्या दराने धान्य देण्यात येत आहे. तसेच या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सांगली जिल्ह्यातील विविध विभागाचे सर्वच  अधिकारी कर्मचारी  अविरत कष्ट घेऊन  अभूतपूर्व उपायोजना, मदत कार्य, नियोजन, आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने विविध गोरगरीब गरजू लोकांना त्यांच्या  उदरनिर्वाहसाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
प्रधानमंत्री अन्न कल्याण योजनेअंतर्गत  प्रतिव्यक्ति पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. परंतु शासनाच्या काही नियम आणि निकषांनुसार २० टक्के जनतेला या योजने पासून वंचित राहावे लागणार आहे. अशा या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी शासनाने सरसकट सर्वांना मोफत धान्य द्यावे, अशी मागणी  चिदानंद तेली यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment