Friday, April 24, 2020

आवंढी येथील रेशन दुकान गैर व्यवहारप्रकरणी सील

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील आवंढी  येथील सुमन विलास पाटील यांच्या नावावर असलेल्या  एकमेव रेशन दुकानाबाबत तक्रारी वाढल्याने आवंढी ग्रामस्थांनी सरळ जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन जत प्रशासनाने दुकान सील केले.

रेशन दुकानातून मालाची पावती न देणे,ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेणे , रेशन कार्डावर असलेल्या माणसापेक्षा कमी लोकांचा माल देणे, अशा बऱ्याच तक्रारी होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गोरगरीब जनतेसाठी मोफत प्रति मानसी 5 किलो तांदूळ उपलब्ध करून दिला आहे ,परंतु हा माल रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळत नव्हता. आवंढी ग्रामस्थांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला आदेश दिले.
गुरुवारी  दुपारी जत तालुक्याचे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी आशिष येरेकर ,प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील, पुरवठा अधिकारी कोळी,तलाठी भोसले यांच्या टीमने रेशन दुकानाचा तपास केला व लोकांच्या तक्रारी ऐकून जबाब घेतले. त्यानंतर दुकानातील शिल्लक राहिलेला 220 किलो साठा पंचनाम्यात नोंद करून घेतला.
परंतु दफ्तर तपासणी पूर्ण झाल्यानंतर माघारी जात असताना अचानक अधिकाऱ्यांना शंका आल्याने दुकानाशेजारील खोली  तपासण्यासाठी दुकानदाराला कुलूप खोलण्याची विनंती केली .परंतु सुरवातीला दुकानदाराने टाळा  खोलण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तुम्ही दुकान खोलणार नसाल तर आम्ही टाळा तोडू ही भूमिका घेतल्यानंतर दुकानदाराने स्वतःहून सर्व अधिकाऱयांच्या समोर टाळा खोलला.
त्या खोलीत गोगरिबांचा लुटलेला अवैधरित्या साठवून ठेवलेला अतिरिक्त 800 किलो तांदूळ आढळून आला. सदरचा माल व खोली सर्कल, तलाठी,पुरवठा अधिकाऱ्यांनी सील केली.

No comments:

Post a Comment