Monday, April 6, 2020

दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमदी, उटगी, बिळूर, वज्रवाड, साळमळगेवाडीसह तालुक्यातील  अनेक गावामध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे डाळिंब व द्राक्षेबागाची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने या दुष्काळी तालुक्यातील  शेतकऱ्यांच्यासाठी धोरणात्मक ठोस निर्णय घेऊन शेतकरी बांधवांना मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

  दुष्काळ  परिस्थितीशी दोन हात करून प्रसंगी टँकर लावून जीवापाड जपलेल्या डाळिंब व द्राक्ष बागेची फळे विक्रीस आली असताना कोरोनाच्या संकटात देशभर लॉग डाऊन झाल्याने जिल्हाबंदी आणि राज्य बंदी झाल्याने परराज्यात जाणाऱ्या द्राक्ष व डाळिंब फळांची विक्री न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच आता अवकाळी पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
 दुष्काळी जत तालुक्यातील अनेक गावामध्ये अवकाळीचा गारासह पाऊस होऊन अनेक द्राक्ष आणि  डाळिंब बागा जमीनदोस्त झाल्याने जत तालुक्यातील शेतकरी बांधवांना या दुहेरी संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक ठोस निर्णय घेऊन या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.
शेतकरी बांधवांची अपरिमित हानी झाली असून कृषी विभाग व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची गरज आहे . कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्यातील असल्याने त्यांनी तातडीने प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत आणि राज्य सरकारने मदतही जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment