Wednesday, April 22, 2020

मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील विदारक वास्तव

दहा बाय दहाची खोली, अकरा लोक आणि शिफ्टमध्ये झोप

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाने शिरकाव करून हाहाकार माजवला आहे. धारावीत आतापयर्ंत १८0 जणांना कोरोनाची लागण झाली असून १२ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील डोकेदुखी वाढली आहे. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण एकट्या धारावीतील आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने धारावीतील वास्तवही पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. दहा बाय दहाच्या खोलीत दहा अकरा लोक राहत असून अनेकजण शिफ्टमध्ये झोप घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यास मज्जाव आहे. शिवाय धारावीतील अनेक विभाग सील करण्यात आल्याने घराबाहेर पडणेही शक्य नसल्याने धारावीतील अनेकांना घरातच राहावे लागत आहे. त्यातच उकाडा वाढल्याने धारावीकरांचा चांगलाच घाम निघत आहे.
धारावीसह मुंबईतील अनेक झोपडपट्टय़ांमध्ये मोकळा श्‍वासही घेतला जात नाही. बिल्डर्सनी मुंबईला बकाल करून ठेवल्याबद्दल प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बिल्डर्सची कानउघाडणी केली होती. मुंबईत साधा मोकळा श्‍वासही घेता येत नाही. बिल्डरांनी इमारतीच्या नावाखाली उभ्या झोपडपट्ट्या निर्माण केल्या आहेत. या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसून साफसफाईही केली जात नाही. विकासाच्या अवशेषांप्रमाणेच या झोपडपट्ट्या आहेत. या बाबत आपल्याला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत टाटा यांनी संताप व्यक्त केला होता.
धारावीतील राहणार्‍या ८५ टक्के लोकांचे हातावर पोट आहे. धारावीत मोठ्या प्रमाणात घरातूनच गृहपयोगी वस्तूंचे उत्पादन केले जाते. छोटे-छोटे लघुउद्योग घरातूनच चालवले जातात. कोरोनामुळे धारावीतील लोकांची ही कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक चणचणीने ग्रासले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करायची असेल तर धारावीसारख्या झोपडपट्ट्यांनीच पुढे आले पाहिजे. त्यांनी पालिकेला सहकार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे. झोपडपट्ट्यांच्या सहभागातूनच पालिकेलाही कोरोना रोखण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे.
एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये तीन लाख लोक
सुमारे २.५ स्क्वेअर किलोमीटरवर क्षेत्रफळावर धारावी परिसर फैलावला आहे. या परिसरात लाखो लोक राहत आहेत. एका अंदाजानुसार एक स्क्वेअर किलोमीटरवर सुमारे तीन लाख लोक राहत आहेत. त्यामुळे एवढ्या गजबजलेल्या परिसरात सोशल डिस्टन्सिंगची ऐसी तैसी झाली आहे. धारावी झोपडपट्टी सर्वात मोठीच नसून सर्वात घनदाटही आहे. या ठिकाणी अनेक चिंचोळ्या गल्ल्या असून चार मजली घरे आहेत. या ठिकाणी एका घरात १0 ते १२ लोक राहतात. घरात जागा नसल्याने अनेक लोक शिफ्टमध्ये झोपत असल्याचे धारावीतील चित्रं आहे.
छोट्या घरात मोठा परिवार
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धारावीसारख्या परिसरात सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण झाले आहे. धारावीतील चाळींतील घरे समोरासमोर आहेत. काही घरे दहा बाय दहाची आहेत तर काही घरे आठ बाय दहाची आहेत. त्यामुळे लोकांना घरामध्ये खुराड्यात कोंबल्यासारखे राहावे लागत आहे. शिवाय घरे छोटी असल्याने घरात धुणीभांडी करणे शक्य होत नाही. त्यामुळे घराच्याबाहेरच धुणीभांडी केली जातात. सर्वचजण सार्वजनिक शौचालयांचा वापर करत असून उघड्यावरच आंघोळ करत असतात. धारावीत कुणाच्याही घरात नळ नाही. सर्वांसाठी सार्वजनिक नळ आहे. नळाला पाणी येण्याच्या वेळाही ठरलेल्या आहेत. त्यामुळे पाणी भरण्यासाठी नळावर लोकांची गर्दी होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदतच होत आहे.

No comments:

Post a Comment