Thursday, April 23, 2020

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यात होणाऱ्या बदल्या रद्द करा

शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषदेसह इतर राज्य शासनाच्या अखत्यारित येणार्‍या विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या माहे मे महिन्यात करण्यात येतात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शासन व यंत्रणा अत्यंत व्यस्त असल्यामुळे यावर्षी मे महिन्यात होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करून प्रशासकीय बदल्यांवर होणारा ५00 कोटींचा खर्च कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर वळता करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडे करण्यात आली आहे.

शासन धोरणानुसार मे महिन्यात विविध शासकीय विभागाच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येतात. १५ मे २0१४ च्या शासन धोरणान्वये जि. प. कर्मचार्‍यांच्याही बदल्या करण्यात येतात. तर प्राथमिक शिक्षकांच्या सन २0१८ पासून शासन स्तरावर ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहे. जि. प. कर्मचार्‍यांच्या २0 टक्के बदल्या करण्यात येतात. यात जिल्हा स्तरावर १0 टक्के तर पंचायत समिती स्तरावर १0 टक्के बदल्या करण्यात येतात. यात जिल्हा व पंचायत समिती स्तरावर ५ टक्के विनंती तर ५ टक्के प्रशासकीय बदल्या करण्यात येते. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या गेल्या दोन वर्षांपासून शासन स्तरावरून ऑनलाईन करण्यात येत आहे. परंतु, या ऑनलाईन बदल्यांबाबत शिक्षक समाधानी नसून शिक्षक 'प्रस्थापित कमी विस्थापित' जास्त होत आहेत. त्यामुळे नवीन शासन अस्तित्वात आल्यानंतर ऑनलाईन बदल्या रद्द करण्याची मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली असून, त्यावर ग्राम विकासमंत्री यांनी सन २0२0 पासून जिल्हा स्तरावर ऑफलाईन बदल्या करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यावर शासनाचा मोठा निधी खर्च होतो, हा निधी देखील कोरोना बाधितांवर खर्च करता येईल. जि. प. कडील ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक व इतर कर्मचारी हेसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक कामासाठी गुंतले असून, अशा परिस्थितीत बदल्या केल्यास विपरीत परिणाम होऊ शकतो. या सर्व परिस्थितीचा विचार करून मे महिन्यात होणार्‍या जि. प. सह इतर शासकीय कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करून प्रशासकीय बदल्यांवर होणारा ५00 कोटींवरील निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर वळता करण्याची मागणी  श्री. ऐनापुरे यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment