Saturday, April 25, 2020

जतच्या सीमेवर असलेल्या घेरडीमध्ये कोरोना रुग्ण आढळला

सोलापुरात रुग्णांची संख्या झाली 50;सीमाभाग सील
फाईल फोटो
सोलापूर,(जत न्यूज वृत्तसेवा)-
इतके दिवस केवळ सोलापूर शहरात धुमाकूळ घालणारा 'कोरोना' आता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही घुसला आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून जिल्ह्यात  आज दिवसभर नवीन नऊ रुग्णांची संख्या वाढली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी शनिवारी सायंकाळी दिली. अशाप्रकारे जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या एकूण 50 झाली आहे.

दरम्यान, सांगोला तालुक्यातील घेरडी येथे मुंबईहून 16 रोजी एक तरुण आपल्या घरी आला होता. त्याला दोन दिवसांपूर्वी ताप व घसा दुखत असल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला सोलापूरला जाण्यास सांगितले. त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या घरात 16 व्यक्ती असल्याचे समजते. त्यातील चार महिलांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले असून पुरुषांना घेरडतील एका शाळेत क्चारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. घेरडी गावचा 3 किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी आढळून आलेल्या 9 रुग्णांपैकी 8 जण शहरातील असून 4 रुग्ण हे शांतीनगर येथील आहेत. 1 कुमठा नाका, 1 लष्कर भागातील, 2 जण मोदीखाना येथील आहेत. हे रुग्ण पूर्वी पॉझिटिव्ह
आढळलेल्या परिसरातीलच आहेत. ग्रामीण भागात सांगोला तालुक्यातील घेरडी या गावात प्रथमच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. इतके दिवस शहरात धुमाकूळ घालणाऱ्या या कोरोना विषाणूची भीती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना होती. मात्र अद्याप ग्रामीण परिसरात एकही रुग्ण आढळून न आल्यामुळे साऱ्यानीच निश्वास सोडला होता. मात्र शनिवारी एक रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. घेरडी येथील ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २४ एप्रिल रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने घेरडीचा तीन किलोमीटर परिसर सील केला असून पुढील सात किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषीत केला आहे.
विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य विभागाने यापूर्वी येळेगाव ते वांगी दरम्यानचा भाग सील केला आहे. येळेगाव येथील बेदाणा शेडवर काम करणारा कामगार मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे परतल्यावर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही  खबरदारी घेतली होती. त्या कामगाराच्या संपर्कातील शेडवरील इतर कामगारांना ताब्यात घेण्यात आले होते. पण सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. मुंबईहून मोहोळ तालुक्यात एका लग्नाला आलेल्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळविण्यात आले होते. या संबंधानेही जिल्हा आरोग्य विभागाने मोठी तपासणी मोहीम राबविली होती. पण आत्तापर्यंत एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळला नव्हता. पण आता घेरडीत रूग्ण आढळल्याने जिल्हा आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे. सोलापुरात शास्त्रीनगर, मोदीखाना, लष्कर येथील आठ रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत. यातील चौघांना सारी व चार जणांना कोरोनाची लाग झाली आहे.

No comments:

Post a Comment