Monday, April 6, 2020

आशा वर्करच्या जिवाची किंमत केवळ ३३ रुपये

जत,(प्रतिनिधी)-
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कामाला लागले. देशपातळीवर संचारबंदी लागू केली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कर्मचार्‍यांना सुट्या दिल्या जात आहे. कोरोनामुक्तीच्या लढय़ात तैनात असलेल्या डॉक्टरांसोबत आशा वर्कर्सही मैदानात उतरल्या आहेत. कोरोना सर्व्हेचे काम आशा कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आले आहे. कोरोनाचे काम करण्यासाठी या कर्मचार्‍यांना सरकार महिन्याला हजार रुपये देणार आहे. अर्थात दिवसाला सरासरी ३३ रुपये आशांना मिळणार असून, आमच्या जिवाची इतकीच किंमत आहे का? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

कर्नाटक येथे एका आशा वर्करवर कार्यरत असताना हल्ला झाला तर महाराष्ट्रात होम क्वारंटाईनचा शिक्का पाहून आशाला गावाबाहेर राहावे लागले. केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने घरातूनही विरोध पत्करून त्या कार्य करीत आहे. शासन आणि लोक या दोघांच्या मधील दुवा म्हणजे आशा. गावात व खेड्यात आरोग्याविषयीची सर्व माहिती शासनास पुरविणे हे मुख्य कार्य त्यांना करावे लागते. ६८ प्रकारची कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात. यातल्या ४२ कामांचे त्यांना पैसे मिळतात. क्षयरोग सर्वेक्षण, टॉयलेट सर्वेक्षणाच्या कामाचे पैसे मिळत नाही. सर्वेक्षणासाठी गेले तर अनेकदा वाईट अनुभव येतात. एखाद्या घरात कुणी व्यवस्थित बोलत नाही, माहितीही बरोबर सांगत नाही. टवाळकी केली जाते. फार तुच्छतेची वागणूक मिळते. आताही तेच चित्र आहे. आशांना अल्प मोबदल्यात विनासुरक्षा घरोघरी जाऊन सर्व्हे करावा लागत आहे. आशा कोरोनाविरुद्धच्या लढय़ात उतरल्या आहेत. मात्र, हा लढा लढताना त्यांना कुठलेही सुरक्षा कवच नाही. मास्क, ग्लोज, सॅनेटाईजर, पीपीई कीट अशी कोरोनापासून बचाव करण्यासाठीचे साहित्य नाही. केलेल्या कामाचा मोबदला कधी मिळेल हेही नक्की नाही. त्यांचे परिवार किंवा सुरक्षेची चिंता हाही मोठा विषय आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हे देशावर ओढवलेले संकट आहे. या महामारीमध्ये जनतेच्या आरोग्याची माहिती पुरविणे आशांचे आद्य कर्तव्य आहे. या संकटात साथ देण्यासाठी व लोकांचा जीव वाचविण्यात मदत करण्यासाठी हे कार्य करण्याचे संघटनेने निर्णय घेतला आहे. कोरोनाचा रुग्ण शोधून काढण्याची जबाबदारी आशा वर्करवर आहे. शासनाने या साथीपासून वाचण्यासाठी कुठलीच पूर्वतयारी केली नाही, हे वास्तव आहे. साधा मास्क ही आशा स्वयंसेविकांना पुरविण्यात आला नाही, अशी खंत आशा कर्मचारी व गटप्रवर्तक युनियनचे नेत्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment