Saturday, April 18, 2020

सांगली शहरात कोरोनाचा शिरकाव;बँक कर्मचाऱ्याला बाधा

सांगली शहर कडक निगरणीत
सांगली,(प्रतिनिधी)-
सांगली कोरोना संसर्गातून बाहेर येत असतानाच सांगली शहरातील एका इसमाला  कोरोना संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. कोरोनाने आता सांगली शहरात शिरकाव केला आहे.  संक्रमित व्यक्ती ही एका बॅंकेतील कर्मचारी आहे. या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटूंबातील ५ जणांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात 21 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यांनी समाधानाचा सुस्कारा टाकला होता,मात्र आता शहरातच रुग्ण आढळल्याने यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. शहरातील मुख्य भाग कडक स्वरूपात लॉक डाऊन करण्यात आले आहेत.

सांगली शहरातील विजयनगर येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती हा शहरातील गणपती पेठ येथील बँकेतील कर्मचारी आहे. १५ एप्रिलला अचानक प्रकृती खालावल्याने शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ज्या मध्ये या व्यक्तीला न्यूमोनिया झाल्याचे समोर आले होते. यानंतर १७ एप्रिलला प्रकृती आणखी खालावल्याने कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना मिरजेतील कोरोना रुग्णालयात दाखल करत स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. ज्यामध्ये त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. संबंधित कोरोना व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर त्या व्यक्तीवर प्रथम उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, मागील महिन्याभरात सदर व्यक्ती यांनी बाहेर कुठेही प्रवास केला नसल्याचे समोर आले आहे. सांगलीच्या गणपती पेठ येथील एका बँकेत ते कर्मचारी म्हणून काम करतात,लॉकडाऊन नंतर ते घरीच होते. आता बँकेतील कर्मचारी आणि बँकेत येऊन गेलेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसाकडून सुरू करण्यात आले आहे. तसेच विजयनगर हा भाग पूर्ण सील करण्यात आला आहे.
तर सांगलीची कोरोना रुग्ण संख्या आता २७ वर पोहचली आहे, ज्यामध्ये मूळ चौघांसह २५ जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.केवळ १ चं कोरोना रुग्ण उरले आहे.मात्र आता सांगलीचा कोरोना रुग्ण संख्या २ झाली आहे. तर गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबला होता. मात्र शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून प्रशासान अधिक सतर्क झाले आहे.

No comments:

Post a Comment