Saturday, April 11, 2020

सांगली जिल्ह्याची लॉकडावूनमधून लवकर सुटका नाही

सांगली,पुणे,मुंबई रेड झोनमध्ये

सांगली,(प्रतिनिधी)-
राज्यात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असला तरी ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुगणांची संख्या कमी आहे,तिथे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला  जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्याचा समावेश 'रेड झोन'मध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत.त्यामुळे इथे लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शनिवारी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी देशातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तशी मागणी राज्यांच्या मुख्यमंत्रयांकडून करण्यात आली होती. मात्र राज्य पातळीवर जनतेला लाभदायक निर्णय घ्या, अशा सूचना मोदी यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अडथळा येऊ नये, शेतमाल विक्री होताना गर्दी होऊ नये. मजूर आणि कामगारांच्या हाताला काम मिळावे,यासाठी नियोजन करण्याच्या ही सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, 14 एप्रिल नंतर काय परिस्थिती असणार आहे,याचे नियोजन चालू असल्याचे काल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत,तिथे लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाईल असे दिसते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की, ज्या जिल्ह्यात 15 पेक्षा अधिक रुग्ण आहेत, तिथे 'रेड झोन' करण्यात येईल. त्याखालील रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो झोन संबोधले जाईल. रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची शिथिलता आणली जाणार नाही, शिवाय तेथील लॉकडावून 30 एप्रिलनंतरही उठण्याची शक्यता नाही. मुंबई, पुणे पाठोपाठ सांगली रेड झोनमध्ये असणार आहे.
कोरोना बाधित जग,देशातील स्थिती
जगात सध्या 17 लाख 16 हजार 680 रुग्ण कोरोनाने बाधित आहेत. 3 लाख 89 हजार 019 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 लाख 3 हजार 851 रुगणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 7 हजार 876 रुग्ण आढळून आले असून 774 बरे झाले आहेत आणि  249 रुगणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 1 हजार 761 रुग्ण आढळून आले असून 208 रुग्ण बरे झाले आहेत तर आतापर्यंत 127 रुगणांचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment