Saturday, April 25, 2020

सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शाळा बंद, पण अध्ययन सुरू!

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा पुढाकार
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती पाहता शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरू झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासमाला सुरू आहे.  शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि सराव सुरू आहे.
त्यामुळे विद्यार्थी अपडेट राहत आहेत. सांगली डायट अधिव्याख्याता, विषय सहाय्यक , समावेशिततज्ज्ञ, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती यांच्या माध्यमातून प्रत्येक  पालकांचे व्हाट्सअप ग्रुप,शिक्षकांचे विविध व्हाट्सअप ग्रुप यांच्या माध्यमातून ही अभ्यासमाला  दररोज पोहोचविण्यात येत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीचा झाला असून याबाबत पालकांनी सकारात्मक प्रतिसाद  देत व समाधान व्यक्त केले आहे.
 याबाबत सांगली डाएटचे प्राचार्य डाॅ.रमेश होसकोटी यांनी सांगितले की, लाॅकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेत जरी येऊ शकत नसले तरीही ते राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (SCEERT) पुणे मार्फत तयार करण्यात आलेल्या दीक्षा ॲप ऑनलाईन अभ्यासमाला व पूर्व प्राथमिक, बाल शिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी दहा वाजता  'गली गली सिम सिम'  हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. या माध्यमातून शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी होत आहेत. दैनंदिन 'झूम मीटिंग' च्या माध्यमातून देखील शिक्षण विभाग व डायट मधील सर्व अधिकारी,विषय सहाय्यक, शिक्षक, सर्व स्वतः गुणवत्ता विकासात सक्रिय राहून कार्य करीत आहेत. तसेच विद्यार्थी, पालक सर्व शिक्षकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.  सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकारी, शिक्षक ,पालक व विद्यार्थी सजगतेने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करून 'स्टडी फ्रॉम होम' हा उपक्रम यशस्वीपणे चालू ठेवले आहेत.  यामुळे विद्यार्थ्यांना घरी राहून अभ्यास करता येत आहे. आपण घरात असूनही अभ्यासाशी गुंतलो आहे, याचा आनंद विद्यार्थ्यांना होत आहे.
         

No comments:

Post a Comment