Saturday, April 4, 2020

पुणे, मुंबई शहरातून गावात आलेल्यांनी १४ दिवस घरातच रहावे

जत पोलिसांचे नागरीकांना आवाहन

जत,(प्रतिनिधी)-
जत पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील 60गावांतील  परिसरातील लोक नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक सह इतर गावात गेलेले होते. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने ते आपल्या मुळगावी परत आले असले तरी त्या बाहेर गावाहून आलेल्या मंडळींनी स्वतःच्या व गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून घराबाहेर पडू नये, असे आवाहन जत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजाराम शेळके यांनी गावागावातून पोलिस हॅन फिरवून केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस चौकीचे बिट अंमलदार विजय वीर, गोपनीय विभागाचे जवंजाळ,आणि पोलिस उपस्थित होते.

ते म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात खळबळ माजली असताना गावखेडयातील ग्रामस्थ हे कोरोना या आजाराला गंभीर घेत नसून चौकाचौकात आजही एकत्र गोळा होऊन बसत आहेत. त्यातच प्रत्येक गावात पुणे, मुंबई व इतर शहरात नोकरीच्या निमित्ताने गेलेले लोक परतले असून यातील एखाद्याला जर कोरोना या आजाराची लागण झाली असेल तर ती १४ दिवस त्याची लक्षणे दिसत नसल्यामुळे कळत नाही. म्हणून गावातील चौकाचौकात न बसता स्वतःची काळजी घेण्यासाठी घरातच बसा, घराबाहेर पडणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. पोलिस आल्यावर घरात जाणाऱ्या लोकांनी पोलिसासाठी नव्हे तर स्वतःसाठी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन १४ एप्रिलपर्यंत घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील पोलिस निरीक्षक राजाराम शेळके यांनी केले.

No comments:

Post a Comment