Saturday, April 4, 2020

अवकाळी पावसामुळे फळबागांच्या नुकसानीची त्वरीत भरपाई द्यावी

श्रीशैल बिराजदार 
उमदी,( वार्ताहर)-
जत तालुक्यातील उमदी येथे गेल्या महिन्याभरात चारवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, कलिंगड व ड्रँगण फूड अशा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, व लॉकडाऊनमुळेहि बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उमदी खालील विठ्ठलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार यांनी केली आहे.

जत तालुक्यातील उमदी येथे पहिल्यांदा डिसेंबर मध्ये अवकाळी पाऊस झाला. द्राक्षमणी तयार होत असतानाच अवकाळीने मणी गळून पडले. त्यावेळी आ. विक्रम सावंत यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे झालेहि, मात्र पहिल्या अवकाळीची नुकसान भरपाई कांही मिळाली नाही. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस दोनवेळा अवकाळी पाऊस झाला. शेडमध्ये ठेवलेल्या बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आत्ता काल शुक्रवारी दि. 3 एप्रिलला उमदी परिसराला झोडपून काढले. अशा अवकाळी पावसामुळे उमदी परिसरातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांवर वारंवार नुकसानीला सामोरे जावे लागल्याने कांहींनी आपली बाग मोडून काढली आहे. यामुळे या भागातील द्राक्ष शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर या परिसरात द्राक्ष बागे बरोबरच कलिंगड व ड्रँगन फुडची बाग लावली आहे. उन्हाळ्यात कलिंगडाला मोठी मागणी असते मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने कलिंगड शेतातच सडण्याची वेळ आली आहे. हे न भरून येणारे नुकसान आहे. ड्रँगण फुड्चे फायदेहि बरेच आहेत. शरीरातील पेशी वाढण्यासाठी ड्रँगण फूड पोषक आहे. मात्र यालाही मागणी नसल्याने शेतात कूजत आहेत. अशा फळबाग टिकवून ठेवण्यासाठी शासनाने त्वरीत मदत करावी, अशी मागणी श्रीशैल बिराजदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment