Tuesday, April 7, 2020

परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनचा निर्णय

मुंबई,(प्रतिनिधी)-
पंतप्रधान नरेंद्र मोदी घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन येत्या १४ एप्रिलला संपणार आहे. मात्र, देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबतची परिस्थिती पाहता सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार अशी चर्चा ऐकू येऊ लागली आहे. अशात महत्त्वाचे म्हणजे देशातील अनेक राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केली आहे, अशी माहिती मिळत आहे. 
या नंतर केंद्र सरकार आता राज्य सरकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यावर विचार करत आहे. देशभरात कोविड-१९ ची वाढती संख्या रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून देशभरात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊन येत्या १४ एप्रिल या दिवशी समाप्त होणार आहे.
दरम्यान, १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळले असल्याने लॉकडाऊनचा निर्णय राज्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य सूचक मानले जात असून अद्याप राज्याच्या स्तरावर लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात मंगळवारी प्रथमच राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानातून ही बैठक घेतली. विविध मंत्री व राज्यमंत्री राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून या बैठकीत सहभागी झाले. १४ एप्रिलनंतर तेव्हाची परिस्थिती पाहून लॉकडाऊन उठविण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण विधान यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे सहभागी होते. मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक आदींनी सहभाग नोंदवला.

No comments:

Post a Comment