Monday, April 27, 2020

देश मोठय़ा नैसर्गिक संकटात सापडणार

जळगाव,(प्रतिनिधी)-
यावर्षी देश मोठय़ा नैसर्गिक संकटात सापडणार आहे. भरपूर पाऊस राहणार असून पीक परिस्थिती साधारण राहील तर अतीवृष्टी भरपूर होईल. देशाचा राजा कायम राहणार असून त्याच्यावर प्रचंड ताण असेल. संरक्षण व्यवस्था मजबूत असली तरी शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. त्यामुळे संघटित होऊन देशावर येणार्‍या संकटाशी लढा करावा लागेल, असे भाकीत भेंडवळ येथील घटमांडणीत वर्तविण्यात आले आहे.
खामगाव तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे ३५0 वर्षापूर्वी चंद्रभान महाराजांनी केलेली घटमांडणी व भाकीत वर्तविण्याची परंपरा यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खंडित होते की काय याची भीती सर्वांनाच होती. मात्र केवळ चार लोकांच्या उपस्थितीत सुप्रसिध्द भेंडवळची घटमांडणी करण्यात आली. या घटमांडणीचे भाकीत अखेर आज दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी केले. त्यामुळे कोरोनातही साडेतीनशे वर्षाची अविरत परंपरा अखंडच राहिली.
अक्षय्यतृतीयेला २६ एप्रिल रोजी भेंडवळ गावात शेतात सायंकाळी घट मांडण्यात आला आणि २७ एप्रिल रोजी पहाटे पुंजाजी महाराज आणि सारंगधर वाघ यांनी घटाचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या आणि या वर्षीची भविष्यवाणी वर्तविली. या मांडणीसाठी कुणालाही पूर्वकल्पना न देता फक्त पुंजाजी महाराज व सारंगधर महाराजांनी घटात जाऊन अवलोकन केले. शतप्रतिशत सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा यावेळी पाळली गेली. या मांडणीला बाहेरगावाहून कुणालाही परवानगी देण्यात आली नव्हती. यावेळी निरीक्षण करताना घटामध्ये करव्यावरील पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी पुर्णत: गायब होती. त्यामुळे संपूर्ण विश्‍वात नैसर्गिक संकटे येतील, कुठे कृत्रिम आपत्ती येईल. परकीय शत्रूपासून घुसखोरी, आतंकवादी कारवाया सुरू राहतील. साथीचे आजार पसरून जग त्रस्त होईल. अनेक ठिकाणी महापूर येतील. प्रचंड अतवृष्टी होईल. भूकंप, त्सुनामीसारखी संकटे देशावर येण्याचे भाकीतही यावेळी वर्तविण्यात आले आहे.
पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे त्यामुळे पीक परिस्थिती साधारण सांगितलेली आहे. यावर्षी कुलदेवतेचा प्रकोप देशावर आहे तर जनमानसावर तसेच पिकांवर सुध्दा रोगराईचे कमी अधिक प्रमाण राहील. चारा पाण्याची टंचाई भासणार आहे. संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. परंतु त्यांच्यावर खूप ताण येईल. या सर्व गोष्टींचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे देशाची आर्थिक तिजोरी खाली होऊन देश आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment