Thursday, April 30, 2020

शिधापत्रिकाधारकांना धान्याबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा

श्रीशैल बिराजदार
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना विषाणूच्या महाभयंकर साथीच्या आजाराला रोखण्यासाठी  सध्या लॉकडाऊन केले आहे. यात 'हातावर आणून पानावर खाणा-यांचे' अन्नपाण्यावाचून हाल होऊ नयेत,म्हणून मदत केली जात आहे. परंतु  याचबरोबर गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तुचेही वाटप करण्यात यावे, अशी मागणी उमदी परिसरातील  सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बिराजदार यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्याबरौबरच जिल्ह्यात कोरोणाच्या पार्श्वमूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र सरकारने गरजू नागरिकांना रेशन दुकानातून तीन महिन्यांचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामध्ये दुसरी कोणतीही रोजीरोटीचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे अन्नधान्याबरोबर शासनाने तेल, तिखट, मीठ हळद, डाळी या जीवनाच्या वस्तूचा स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात यावे, अशी मागणी बिराजदार यांनी केली आहे. सध्या लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या हातात पैसे नाहीत. शासन फक्त गहू, तांदूळ देत आहे, मात्र तेल,चटणी, मीठ यांची सोय नागरिकांनी कोठून करायची? काम नसल्याने त्यांच्या हातात पैसे नसल्याने इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी त्यांना इतरांकडे हात पसरावे लागत आहे. यात स्वाभिमानाने जगणाऱ्या लोकांचे हाल सुरू आहेत. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून गोरगरिबांना इतर जीवनावश्यक वस्तूंचे किट पुरवावे, अशी मागणी श्री. बिरादार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment