Thursday, April 16, 2020

सोलापुरात एकाच दिवशी दहा कोरोनाबाधित आढळले

नर्समुळे नऊ जणांना लागण
सोलापूर,(प्रतिनिधी)-
सोलापुरात गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे दहा रुग्ण आढळले आहेत. ४२ संशयित रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असता त्यात दहा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून आले. तर अन्य ३२ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
गेल्या रविवारी तेलंगी पाच्छा पेठ या दाट लोकवस्तीच्या भागातील बसवण्णा चौक परिसरातील एका मृत व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.
तत्पूर्वी, मृत व्यक्तीला सुरुवातीला ज्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील एका महिला कर्मचा-यालाही कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर दोन्ही कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १६९ रुग्णांची वैद्यकीय चाचणी केली असता त्यांपैकी १६६ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यात दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. यात मृत व्यापार्‍याच्या संबंधातील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर अन्य नऊ व्यक्ती त्याच भागातील म्हणजे तेलंगी पाच्छा पेठेतील राहणारे आहेत.
कोरोनाबाधित महिलेच्या घरात राहतात वीसजण
दहापैकी एक रूग्ण मृत व्यक्तीच्या तर अन्य सर्व नऊ व्यक्ती खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित महिला कर्मचार्‍याच्या संबंधातील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित महिलेच्या वाडावजा घरात वीसजण राहतात.

No comments:

Post a Comment