Sunday, April 19, 2020

जत तालुक्यात 'लॉकडाऊन' ची कडक अंमलबजावणी करा

संजय कांबळे
जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सोलापूर जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यातील विजयपूर व बेळगाव या जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोट्या प्रमाणात आढळल्याने कोरोना ही महामारी जत तालुक्यात शिरकाव करू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जत तालुक्यात कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, जत हा तालुका सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असणारा कर्नाटक राज्याच्या सिमेवरील तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिणेला व पूर्वेला कर्नाटक राज्याच्या बेळगाव व विजयपूर जिल्हयाच्या सिमा असून उत्तर बाजूस सोलापूर जिल्ह्याची सिमा येते.
तालुक्याच्या सिमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील बेळगाव या जिल्ह्यात कोरोनाचे पन्नासवर रूग्ण तर विजयपूर या जिल्ह्यात कोरोनाचे सतरा रूग्ण आढळले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे पंधरा रूग्ण आढळले असून दोन कोरोना रूग्ण बळी गेले आहेत.
जत तालुक्यात सद्यातरी कोरोनाचे रूग्ण नसलेतरी भविष्यात तालुक्याच्या सिमावर्ती भागातील कोरोना रूग्णाच्या संपर्क व संसर्गातील लोक या तालुक्यात शिरकाव करू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जत तालुक्यात कठोर पावले उचलली पाहीजेत. यासाठी कर्नाटक राज्यातून त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातून जत तालुक्यात येणारे सर्व प्रमुख मार्गावर त्याचप्रमाणे चोरवाटावर पोलीस प्रशासनाने व गावच्या स्थानिक प्रशासनाने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले पाहिजे.
परजिल्ह्यातून व कर्नाटकातून वैद्यकिय उपचार तसेच अन्य कारणे सांगून जे तालुक्यात घुसखोरी करित आहेत अशा लोकांची तसेच त्यांच्याकडील स्वताची ओळख पटविणारी व वहानाची कागदपत्रे यांची सखोल चौकशी केली पाहीजे. यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबतच भारतीय लष्करातील सेवानिवृत्त लोकांना सिमावर्ती भागात प्राधान्य दिले पाहिजे. तरच या कोरोनारूपी महामारी चा तालुक्यात होणारा शिरकाव थांबविता येईल.
महत्त्वाचे म्हणजे जत शहरासह तालुक्यातील बहुतांशी लोकांची नाळ ही कर्नाटक राज्याशी जोडलेली आहे. तसेच तालुक्यातील छोटेमोठे व्यापारी हे आपल्या दुकानाकरिता लागणारा माल हा कर्नाटकातूनच खरेदी करित असल्याने. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील बहुतांशी कोरोनाचे रूग्ण हे दिल्लीच्या मरकजशी सबंधित असल्याने तसेच जत तालुक्यातील बहुतांशी गावात या तबलिगी जमातीच्या कोरोनाबाधित रूग्णाशी सबंधित नातेवाईक असल्याने प्रशासनाने याचाही विचार करावा.
तालुक्यात कोरोणाचा शिरकाव होऊ नये यासाठी जतचे उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत आवटे, तहसिलदार श्री. सचिन पाटील, संखचे अप्पर तहसीलदार श्री. प्रशांत पिसाळ,जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके, उमदिचे पोलीस निरिक्षक श्री. दत्तात्रय कोळेकर तसेच पोलीस कर्मचारी, विशेष पोलीस अधिकारी, माजी सैनिक हे त्यांच्या परीने प्रयत्न करित आहेत. जतचे तालुका वैद्यकिय अधिकारी श्री. संजय बंडगर व त्यांचे आरोग्य कर्मचारी या सर्वांचा कोरोना मुक्तीचा प्रयत्न सुरू असलातरी आपणही राज्यशासनाचे माध्यमातून सिमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातून कोरोनाचा शिरकाव जत तालुक्यात होऊ नये यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी संजय कांबळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment