Thursday, April 16, 2020

मनरेगातर्फे ग्रामीण रोजगाराचा दिलासा

राज्यात ३५ हजार कामांना मिळाली मंजुरी 
जलसंधारण व सिंचनाच्या कामांना प्राधान्य
(फाइल फोटो)
मुंबई,(प्रतिनिधी)-
कोरोना प्रतिबंधासाठी सध्या संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची उपाययोजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर हातावर पोट असणार्‍या या घटकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारा हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.
राज्यात या योजनेतून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील जनतेसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: लॉकडाऊनमुळे विविध औद्योगिक तसेच वाणिज्यिक आस्थापना बंद असल्याने त्याचा मोठा फटका कामगार आणि हातमजुरी करणार्‍यांना बसला आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने ३ मेपर्यंत या मजुरांच्या अडचणीत वाढ होण्याची मोठी भीती व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाने सोशल डिस्टन्सिंग विषयक निर्देशांचे पालन करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जलसंधारण, सिंचन विहीरी, पशुंसाठी गोठय़ांचे बांधकाम, व्हर्मी कंपोस्ट, फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरूपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते जलसंधारण, नाला सरळीकरण, सामूहिक विहीरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे घेणे सुलभ झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए. एस. आर नायक यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात सोमवारपासून कामांना प्रारंभ
गावात दवंडी देऊन नमुना नंबर चार मध्ये मागणी घ्यावी . वैयक्तिक कामावर ( घरकुल , विहीर , शोषखड़े . . . ) जास्तीत जास्त भर द्यावा . कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखावे . मजुरांना सॅनिटायझर , साबण , मास्क आदी साहित्य पुरवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर राहणार आहे . जिल्ह्यात शेतमजूर , ऊस तोडणी कामगार यांना कामे पुरवायची आहेत . साधारणपणे 30 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांना प्राधान्याने काम द्यावे . सुरुवातील अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी . प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक काम सुरू करण्याची दक्षता घ्यावी . ग्राम रोजगार सेवकांची देयके तत्काळ सादर करावीत , अशा सुचना दिल्या . तालुकानिहाय सेल्फवर असलेल्या कामांची माहितीही राऊत यांनी घेतली . मनरेगाची कडेगाव तालुक्यात 256 , मिरज 566 , आटपाडी 563 , तासगाव 224 , कवठेमहांकाळ तालुक्यात 110 कामे अपूर्ण आहेत . अपुर्ण कामे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी , अशी सुचनाही राऊत यांनी केली . मजुरांना तपासणीसाठी कामाच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भेट होणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले .

No comments:

Post a Comment