Monday, April 6, 2020

जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्मचाऱ्यांना सॅनिटाईजर व मास्क द्यावे

विजयकुमार बगली
सोन्याळ,(वार्ताहर)-
देशासह राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही जिल्हा मध्यवर्ती बँकेसह शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व राष्ट्रीयकृत,अर्बन,खाजगी बँका अविरतपणे सुरू आहेत. त्यात काम करणारे अधिकारी, कर्मचारी एकप्रकारे या कोरोनाच्या महामारीत स्वतःचे जीव धोक्यात घालून देशसेवा करीत आहेत.त्यांच्यामुळे सर्वांची आर्थिक घडी सुरळीत सुरू आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव त्यांनाही होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांना 50 लाखाच्या विम्यासह सॅनिटाईजर मास्क यासारखे संरक्षण साधने  देण्याची मागणी सोन्याळ ग्रामपंचायत  सदस्य विजयकुमार बगली यांनी केली आहे.

वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विविध बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी स्वतःचे जीव धोक्यात घालून अनेक दिवसांपासून  ग्राहकांची सेवा करीत आहेत. त्यांनाही स्वतःच्या जिवाबरोबर कुटुंबाची काळजी असते. प्रत्येक बँकेत दररोज शेकडो ग्राहक येत  असतात. त्यांच्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती असताना सुद्धा स्वतःचे जीव धोक्यात घालून हे कर्मचारी लोकांच्यासाठी काम करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात  दिवसागणिक  कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या कोरोनाच्या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन व राज्य सरकार निकराचे प्रयत्न करीत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कर्मचाऱ्यांनी सॅनिटाईजर आणि मास्क वापरणे गरजेचे आहे. सध्या बाजारामध्ये सॅनिटायझर मिळत नाही. केंद्र सरकारने सॅनिटायझरचा समावेश ‘अत्यावश्यक’ घटकांत केला आहे. तरी देखील सॅनिटायझर व मास्कचा काळाबाजार सुरु आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर राष्ट्रीयकृत,सहकारी व  नागरी बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व मास्क मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध करुन द्यावे  अशी मागणी बगली यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

No comments:

Post a Comment