Wednesday, April 8, 2020

बिळूर परिसरात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

जत,(प्रतिनिधी)-
 मान्सूनपूर्व वळीव पावसाने तालुक्यातील दक्षिण  व पूर्व गावातील काही गावांना गारपिटने झोडपले आहे. यात द्राक्ष भागांचे  कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करून दिलसा द्यावा. तसेच द्राक्ष या पिकाचा विमा शासनाने भरावा अशी मागणी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केली.

श्री. जमदाडे यांनी तालुक्यातील बिळूर, वज्रवाड, खोजनवाडी येथील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त द्राक्षे  बागांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य रामांणा जिवान्नवर,उमराणी सोसायटी अध्यक्ष आप्पासो नामद , बसर्गी सोसायटीचे अध्यक्ष शिवाप्पा तावंशी, बिळूरचे सरपंच नागनगोंडा पाटील, आदी उपस्थित होते.
    जमदाडे म्हणाले, जत तालुक्यातील   बिळूर, सिंदूर ,उमराणी, खोजनवाडी या गावासह पूर्व भागातील काही गावात  अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात अपरिमित हानी झाली आहे. एकीकडे उत्पादित द्राक्षे पिकाला योग्य दर मिळत नाही तर गारपिटीने द्राक्षबागा जमीनदोस्त झाले आहेत. परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.  उन्हाळ्यात टॅंकरने  पाणी विकत आणून बागा जगवल्या आहेत. संचार बंदीमुळे दक्षिण भारतातील दिल्ली, कोलकाता, गुंटूर, विशाखापट्टणम, बेंगलोर चेन्नई,विजयवाडा या मार्केटमध्ये कमी मागणी आहे. तसेच द्राक्षे घेत असताना कोरोनाची धास्ती घेतली आहे. अशा प्रकारे शेतकरी  आर्थिक चक्रव्यूहात अडकला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचे जीवनमान ढासळले आहे.
       दुष्काळी जत तालुक्यातील शेतकरी कायम नैसर्गिक अस्मानी संकटांना तोंड देत आहे, तरी शासनाने सारासार विचार करून द्राक्षे बागांच्या पिक संरक्षण विमा भरावा .जेणेकरून शेतकरी द्राक्षबागा  करण्याकडे वळेल. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल.

No comments:

Post a Comment