Thursday, April 30, 2020

लॉकडाऊन’ कालावधीत ७० टक्के नागरीक चिंताग्रस्त

कोरोनाबाबत डीवायपाटील फार्मसी महाविद्यालयाने केले सर्वेक्षण
पिंपरी : आरोग्य सेवांमध्ये दर्जात्मक सुधारणा गरजेची, २० टक्के जनता कोरोना बाबतीत अनभिज्ञ, ७० टक्के नागरीक चिंताग्रस्त असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाने ’लॉकडाऊन’मध्ये केलेल्या राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन सर्वेक्षणातून निदर्शनास आले.

दैनिक केसरीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की,पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयाने कोविड-१९ या साथीबद्दलची जागरूकता व जीवनशैलीवरील परिणाम यांचे विश्लेषण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विविध ऑनलाइन सर्वेक्षण केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोविड१९ या साथीच्या आजाराच्या विविध पैलूंशी संबंधित सर्वेक्षण करण्यासाठी सर्व सदस्य देशांना मार्गदर्शक सूचना दिल्या. कोविड-१९चा वाढत जाणारा प्रकोप व संसर्ग रोखण्यासाठी केलेली देशव्यापी टाळेबंदी व बंधने आदी बद्दल भारतीयांमध्ये असलेली जागरूकता व परिणाम याबद्दल महाविद्यालयीन एथिक्स समितीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, महाविद्यालयाने विविध ऑनलाइन सर्वेक्षण केले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या १० जणांच्या टीमने सर्वेक्षण केले. सदर सर्वेक्षणामध्ये लॉकडाउन-२ मध्ये दहा दिवसांच्या कालावधीत १७१७ इच्छुकांचे प्रतिसाद प्राप्त झाले.
या सर्वेक्षणामध्ये देशभरातून कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्तान, केरळ व महाराष्ट्र येथील नागरिकांनी सहभाग घेतला.संख्याशास्त्रीय प्रतिसादानुसार 49.35 टक्के प्रतिसाद हे 20 ते 30 वयोगटातील लोकांचे, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले 37.8 टक्के व 35 टक्क्के नोकरदार अशी वर्गवारी प्राप्त झाली. सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार 80 टक्के लोक कोविड साथ व घ्यावयाची काळजी याबद्दल जागरूक आहेत, तथापि 13 टक्क्के लोक त्यांच्या शहर अथवा जिल्ह्यातील कोविडशी संबंधित आरोग्य सेवांविषयी पूर्णत: अनभिज्ञ आहेत.
कोविड-१९ संबंधी आरोग्य व्यवस्थेतील महत्वाचा घटक फार्मसीस्ट सर्वसामान्यांना समुपदेशनामध्ये तत्पर आहेत असे, ५३.८ टक्के प्रतीसादांमधून निष्कर्षित होते. सद्यपरिस्थितीमध्ये कोविड बद्दलची ऑनलाइन माहिती विविध माध्यमांमधील सततची माहिती, कोविड चे उपचार, प्रतिबंधक औषधे इ. व अशा विविध गोष्टींमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होत आहेत व सर्वेक्षणातील निष्कर्ष सूचित करतात की सुमारे ७० टक्के लोक चिंताग्रस्त आहेत.
सर्वजण केंद्र व राज्य सरकारच्या सर्व उपक्रमांना पाठिंबा देत आहेत. मात्र, भारतातील आरोग्य सेवांच्या सुविधा व दर्जामध्ये नितांत व तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे, तरच आपण कोविड-महामारी सारख्या संकटांचा सामना भविष्यात करू शकतो, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून स्पष्ट झाला आहे.
निष्कर्ष हे प्राप्त झालेल्या प्रतिसादांनुसार केवळ अभ्यासासाठी व संशोधनाच्या दृष्टीने प्रकाशित केले आहेत. कोविड या जागतिक आपती संदर्भात राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन सर्वेक्षण केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील व विश्वस्थ डॉ. स्मितादेवी जाधव यांनी प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, डॉ. आशा थॉमस, डॉ. स्नेहा चंदानी, डॉ.मारुती शेलार व विभागप्रमुख यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment