Tuesday, April 7, 2020

घरीच दाढी, केस कापण्याची वेळ

जत,(प्रतिनिधी)-
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात 18 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बदला आहे. याचा मोठा फटका केशकर्तन करून आपली उपजीविका करणाऱ्या बांधवांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. लॉक डाऊन झाल्यापासून केशकर्तनाची दुकाने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली असून त्यांना घरातच दाढी आणि केस कापण्याची वेळ आली आहे. काहींनी श्रावण महिन्यात जशी दाढी,केस वाढवले जातात, तशी या कालावधीतही दाढी,केस वाढवले आहेत.

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. अगदीच महत्वाची कामे वगळता इतर कामे पुढे ढकलली जात आहेत. जत शहरासह ग्रामीण भागात सर्वच सलूनची दुकाने बंद आहेत. त्यामुळे वाढलेले केस कापण्यासाठी ग्रामीण भागातील युवक घरीच ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांची दाढी व कटिंग करत आहेत. लॉक डाऊन काळात अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. किराणा दुकान आणि मेडिकल स्टोअर्स सोडले तर सर्वच दुकानांना टाळे लावण्यात आले आहेत. पानपट्टी दुकाने, रस्त्यावरचे चहा, नास्ता गाडे, स्टेशनरी, वाहनांची पंक्चर काढणारी दुकाने, कपडे विक्री करणारी दुकाने, हॉटेल, वडापाव सेंटर, दारू विक्री करणारे वाइन शॉप,चिकन, मटण विक्रीचायनीज पदार्थ विक्री करणारी दुकाने या संचार बंदीच्या काळात बंद ठेवण्यात आली आहेत. या लॉक डाऊनचा फटका त्यांना बसल्याने सध्या त्यांची मोठी आर्थिक ओढाताण सुरू आहे. अनेकांचे सेव्हिंग संपले आहे. सध्या पोटापाण्यासाठी उधार उसनवारी सुरू आहे.
सध्या गुटखा,तंबाकू आणि दारू आदींची  विक्री करण्यास बंदी आहे. पण तरीही गुटखा, दारू कशी उपलब्ध होते, असा प्रश्न निर्माण होतो. आमदार विक्रम सावंत यांनी दारू, गुटखा विक्री बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment