Sunday, May 17, 2020

चोरून जत, सांगोला तालुक्यात येणाऱ्या 106 जणांना पकडले

सांगोला पोलिसांची कारवाई; सर्व नागरिक मुंबईचे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या कोरोना संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही मुंबईहून तीन खासगी वाहनांतून 106 नागरिकांनी कुटुंबियांसह विनापरवाना व बेकायदेशीररित्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात प्रवेश केला असून या सर्वांना सांगोला पोलिसांनी क्वारंटाईन केले आहे. या मध्ये जत तालुक्यातील राजोबाचीवाडी, निगडी येथे येणाऱ्या कुटुंबांचा समावेश आहे. अजूनही मुंबई,पुण्याचे लोक चोरून गावी परतत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. याचा लोकांनी धसका घेतला आहे.

मुंबईतून  सांगोला येथे आलेल्या लोकांवर इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी खासगी वाहन मालकांसह 106 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई 17 में रोजी सकाळी आठच्या सुमारास करण्यात आली आहे. हे सर्व कुटुंब सांगोला आणि जत तालुक्यातील आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे भयभीत झालेल्या मूळचे जत आणि सांगोला तालुक्यातले लोक आपापल्या गावी परतू लागले आहेत.
दरम्यान, मुंबईतून खासगी वाहन क्रमांक एमएच 04/जीपी 5421,एमएच 04/जीपी 5007, एमएच 47/वाय 7373 अशा तीन वाहनांतून रविवारी17 में रोजी आलेली तीन खासगी वाहने पोलिसांनी रोखून पोलीस ठाण्यात आणली. वाहन मालकाने मुंबईतून सांगोला तालुक्यातील बुरंगेवाडी, वाकी-घेरडी, पारे, गावडेवाडी, हांगीरगे, चोपडी, पाचेगाव, राजोबाचीवाडी (जत), निगडी (जत), जवळा, खवे, हजापूर, शिरसी (मंगळवेढा, ढालगाव (कवठेमहांकाळ) येथे येण्यासाठी प्रवासी लोकांकडून प्रत्येकी 2 हजार 500 रुपये प्रमाणे 2 लाख 62 हजार 500 रुपये भाडे घेतले आहे. या 106 इसमांनी सोलापूर जिल्हा बंदी मोडून सांगोला तालुक्यात प्रवेश केला. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान त्यांच्याकडे जिल्हा प्रवेशाबाबत लागणारा विहित परवाना आहे काय याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून या आजारावर प्रतिबंधक औषध नाही. या आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून कोणीही घराबाहेर पडू नये, अशा सूचना सरकारकडून आहेत.
राज्याची आणि जिल्ह्याची सीमा बंद असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून या लोकांनी मुंबई येथून खासगी वाहनांतून सोलापूर जिल्ह्यात घातकीपणे प्रवेश केला म्हणून सरकारतर्फे पो.नि. संजय पवार यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व 188, 270 महाराष्ट्र पोलीस कायदा 37, 135 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment