Monday, May 11, 2020

लकडेवाडीत वादळी वाऱ्याचा दणका; पन्नास घरांची पडझड

झाडे उन्मळली, विजचे खांब मोडले; नुकसान भरपाईची मागणी
(वादळी वाऱ्यानेघराचे छप्पर उडून गेले आहे.)
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील लकडेवाडी येथे वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या  पावसाने मोठा दणका दिला असून काही घरांचे छत कोसळले तर अनेकांचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे असंख्य झाडे उन्मळून लांबवर उडून पडले आहे. विजेच्या खांबा मोडून पडल्याने तारा तुटल्या आहेत.त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
आधीच कोरोना आणि यात अवकाळी पावसाचा फटका यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. घरांची पडझड झालेल्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच एकनाथ बंडगर यांनी केली आहे.   
रविवारी रात्री आठच्या सुमारास सोसाट्याचा जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्याचे घराचे  छत  कोसळले तर काहींच्या घरावरील पत्रे उडून गेली. या दुर्घटनेत जीवित हानी टळली. मात्र घरातील अन्नधान्य, कपडे, विद्युत उपकरणे, फर्निचर व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.  जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या शेतातील झाडे उन्मळून पडली आहेत तर विजेच्या खांबा मोडून तारा तुटल्या आहेत.  सोन्याळ आणि माडग्याळ येथील वीज कर्मचाऱयांनी विजेचे नवीन पोल आणून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे. काहींच्या द्राक्षबागेला धोका पोहचला असून बागेवरील छताचे नुकसान झाले आहे. लकडेवाडी आणि परिसरातील  या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी नूतन मोहकर यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पडझड झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी सरपंच एकनाथ बंडगर,माजी उपसरपंच भाऊसाहेब कटरे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन तानाजी लकडे, अशोक ऐवाळे आदी उपस्थित होते.       
   
राजेंद्र बापू करवर, गजेंद्र बाबा वाघमोडे, शिवाजी अर्जुन बंडगर तुकाराम विठोबा खोत, मनोज नारायण इंगोले, पांडुरंग रामजी वाघमोडे, देवना रामजी वाघमोडे, सिताराम अर्जुन बंडगर, काशिनाथ रघुनाथ बंडगर या शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून  आणि छत कोसळून प्रत्येकी सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या त्यांना इतरत्र रहावे लागत आहे. उडालेली पत्रे फाटले असून नवीन पत्रे आणण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात पत्रे खराब झाले असून आम्हाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यानी  केली आहे.

No comments:

Post a Comment