Saturday, May 2, 2020

बनाळीतील मायलेकाचा अहवाल निगेटिव्ह

गावासह तालुक्याने टाकला निःश्वास
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील बनाळी येथील आई आणि मुलगा सोलापूर शहरातील कोरोना झालेल्या डॉक्टर आणि नर्स यांच्या संपर्कात आल्याने गावात खळबळ उडाली होती. मात्र त्यांची मिरज येथे तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने गावाने आणि तालुक्याने सुटकेचा निःश्वास टाकला.
याबाबत अधिक माहिती अशी की,  बनाळी येथील महिलेला सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल येथे प्रत्येक आठवड्यात डायलिसिस करण्यात येत होते.
मात्र या हॉस्पिटलचे डॉक्टर आणि सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, 28 एप्रिल रोजी बनाळी येथील आई आणि मुलगा या दवाखान्यात या खासगी वाहनाने गेले होते. या डॉक्टरांच्या संपर्कात आल्याचे प्रशासन यंत्रणेला समजल्यानंतर त्यांनी सोलापूरहून आलेल्या या दोघांना मिरज येथे त्याच रात्री पाठवले. तिथे त्यांची तपासणी करण्यात आली. हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे गावाने सुटकेचा निःश्वास टाकला. जत तालुक्याचे लक्ष या अहवालाकडे लागले होते.
दरम्यान, बनाळी येथील दोघांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्व शंका दूर झाल्या आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जायचे काही कारण नाही. असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment