Saturday, May 23, 2020

जि.प. आणि पं. स. कर्मचार्‍यांच्या अखेर बदल्या रद्द

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या मे महिन्यात करण्यात येतात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शासन व यंत्रणा अत्यंत व्यस्त असल्यामुळे यावर्षी मे महिन्यात होणार्‍या जि. प. ,प.स. कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करून प्रशासकीय बदल्यांवर होणारा ५00 कोटींचा खर्च कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची वळता करण्याची मागणी विविध संघटनांकडून ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे करण्यात आली होती. या मागणीस राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रतिसाद दिला असून, १९ मेच्या पत्रानुसार आता जि. प. कर्मचार्‍यांच्या यावर्षीच्या अर्थात २0२0 मध्ये बदल्या होणार नाहीत, हे स्पष्ट केले आहे.

बदल्या न होण्यासाठी ग्रामविकास विभागाने वित्त विभागाच्या ४ मेच्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. जि. प. कर्मचार्‍यांच्या शासन निर्णय १५ मे २0१४ च्या शासन धोरणानुसार बदल्या करण्यात येतात तर प्राथमिक शिक्षकांच्या सन २0१८ पासून शासन स्तरावर ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहे. जि. प. कर्मचार्‍यांच्या २0 टक्के बदल्या करण्यात येतात. यात जिल्हा स्तरावर १0 टक्के तर पंचायत समिती स्तरावर १0 टक्के बदल्या करण्यात येतात. यात जिल्हा व पंचायत समिती स्तरावर ५ टक्के विनंती तर ५ टक्के प्रशासकीय बदल्या करण्यात येते. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या गेल्या दोन वर्षांपासून शासन स्तरावरून ऑनलाईन करण्यात येत आहेत. परंतु, या ऑनलाईन बदल्यांबाबत शिक्षक समाधानी नसून शिक्षक 'प्रस्थापित कमी विस्थापित' जास्त होत आहेत. त्यामुळे नवीन शासन अस्तित्वात आल्यानंतर ऑनलाईन बदल्या रद्द करण्याची मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली होती. त्यावर ग्रामविकास मंत्री यांनी सन २0२0 पासून जिल्हा स्तरावर ऑफलाईन बदल्या करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यावर शासनाचा मोठा निधी खर्च होतो. हा निधीदेखील कोरोनाबाधितांवर खर्च करता येईल. जि. प. कढील ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक व इतर कर्मचारी हेसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक कामासाठी गुंतले असून, अशा परिस्थितीत बदल्या केल्यास विपरित परिणाम होऊ शकतो.
या सर्व परिस्थितीचा विचार करून मे महिन्यात होणार्‍या जि. प. कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करून प्रशासकीय बदल्यांवर होणारा कोट्यवधींचा निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची वळता करण्याची मागणी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. जि. प. कर्मचार्‍यांच्या बदल्या रद्द झाल्यामुळे आता कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास जि. प. प्रशासनास लक्ष केंद्रीत करता येणार आहे.

No comments:

Post a Comment