Sunday, May 24, 2020

सलून दुकान बंदमुळे टक्कल हाच पर्याय

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना विषाणूच्या प्रादरुभावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सलून दुकान बंद असल्यामुळे डोक्यावर वाढलेले केस कापण्यासाठी वारंवार केस कापण्यापासून मुक्तता व्हावी म्हणून काहींनी टक्कल हाच पर्याय शोधला असल्याचे जतमध्ये चित्र आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून सलून दुकाने देखील बंद झाली. गेल्या दोन महिन्यांपासून दुकान बंद असल्यामुळे सलून व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सध्या युवकांमध्ये स्मार्ट दिसण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. तसेच चित्रपट व टीव्ही सिरीयल कलाकार विविध प्रकारच्या हेअर स्टाईल करीत असल्यामुळे त्या करण्याकडे युवकांचा कल असतो. त्यामुळे महिन्यातून दोन ते तिनवेळा सलूनमध्ये जाणे ही आवश्यक बाब बनली आहे. दाढी कटिंगसोबत वेगवेगळय़ा स्टाईलची केस कटिंग, फेस मसाज, बॉडी मसाज, फेशियल व अन्य प्रकार करण्यासाठी युवक वाटेल तेवढे पैसे खर्च करतात.
सलून दुकानामध्ये एकच नॅपकिन अनेक लोकांसाठी वापरला जातो. त्यामुळे कोरोनाचा धोका होऊ शकतो. मोठय़ा प्रमाणात संसर्ग होण्याची भीती व्हॉटसअँप व सोशल मीडियावर पसरविल्यामुळे तसेच २४ मेपासून लॉकडाऊन झाल्यामुळे शहरातील लहान मोठे सलून दुकान बंदमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच दुकान बंदमुळे डोक्यावर वाढलेले केस व दाढी करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून मोबाईलद्वारे कॉल करून दाढी कटिंग करण्यासाठी घरी बोलाविले जाते आहे.
काहींनी सामान घरी आणून घरीच दाढी करणे सुरू केले तरी डोक्यावर वाढलेले केस कापण्यासाठी वारंवार घरी बोलाविण्यापेक्षा काहींनी यावर उपाय म्हणून सरळ टक्कल करण्याचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे शहरात टक्कल असणारे आढळून येत आहे.
दोन महिन्यांपासून दुकान बंदमुळे चवथ्या लॉकडाऊनमध्ये शासन दुकान उघडण्याची परवानगी दिली असली तरी ग्राहक मात्र त्यांना मिळेना. लोक सलून दुकानात जायला घाबरत आहेत. त्यामुळे सलून दुकानदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर सलून दुकानात काम करणारे कारागीर शहरामध्ये फिरून दाढी कटिंगसाठी विचारणा करीत असल्याचे आढळून येत आहे.

     

No comments:

Post a Comment