Sunday, May 31, 2020

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करा आणि देश आत्मनिर्भर बनवा -सोनम वांगचुक

भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले आहे. २0१८ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणार्‍या वांगचुक यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामधून त्यांनी भारतीय खूप मोठय़ा प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असतात असे म्हटले आहे. एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळुरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असे मत वांगचुक यांनी व्यक्त केले आहे.
सध्या भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे वांगचुक यांनी लेह-लडाखमधील एका निर्जन ठिकाणी बसून विस्तृत विवेचन केले आहे. कोरोनामुळे चीनचे आर्थिक कंबरडे मोडले असून आता चीन पुन्हा उभा राहण्यासाठी धडपडत आहे. चीनचा जीडीपी मोठ्या प्रमाणात पडला आहे. तेथे मोठ्याप्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनतेमध्ये असंतोष आहे. मात्र या असंतोषाचा उद्रेक होऊ नये म्हणून चीन आजूबाजूच्या देशांशी काही ना काही खुसपटं काढत असल्याचे निरिक्षण वांगचुक यांनी नोंदवले आहे. चीनमधील नागरिकांमधील देशभक्तीची भावना एकत्र आणण्यासाठी आणि तेथील आर्थिक परिस्थितीमुळे उद्रेक होऊन राज्यकर्त्यांविरोधात रोष निर्माण होऊ नये म्हणून चीन आजूबाजूच्या देशांबरोबर काही ना काही विषयावरुन संघषार्ची परिस्थिती निर्माण करु पाहत आहे. आज चीनमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे. मात्र तेथील राजकीय परिस्थितीमुळे देशातील १४0 कोटी जनता सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. जनतेमधील असंतोष उफाळून येऊ नये म्हणून त्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी चीन आजूबाजूच्या देशांशी संबंधित अनेक विषयांना हात घालत आहे, असं वांगचुक म्हणाले आहेत.
सध्याच्या परिस्थितीमध्ये केवळ भारतीय जवानांनी गोळ्यांनी उत्तर देऊन भागणार नाही तर सर्वसामान्य माणसांनीही चीनला उत्तर देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं वांगचुक यांनी म्हटलं आहे. भारत चीनमधून वर्षभरामध्ये ५.२ लाख कोटींचे सामान आयात करतो तर निर्यात १.२ लाख कोटी इतकी आहे. म्हणजे आयात आणि नियार्तीमध्ये ४.२ लाख कोटींची तफावत आहे. हाच पैसा चीनला जाऊन बंदूक आणि हत्यारांच्या माध्यमातून आपल्या जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो. म्हणूनच आपल्या देशातील १३0 कोटी जनता आणि परदेशातील तीन कोटी भारतीयांनी एकत्र येऊन देशात आणि जगभरामध्ये चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरु केल्यास त्याला जगभरातून प्रतिसाद मिळू शकतो. आज जगभरामध्ये चीनविरोधी वातावरण आहे. जगभरामधून चीनी सामानावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली तर चीनची भिती सत्यात उतरेल आणि तेथील अर्थव्यवस्था कोसळेल. सामान्य लोकं रस्त्यावर येऊन विरोध नोंदवतील आणि त्या माध्यमातून चीनमध्ये सत्तांतर होईल. असं झालं नाही तर दुदेर्वाची गोष्ट असेल कारण एकीकडे आपले सैनिक चीनविरोधात सीमेवर लढत असतील तर दुसरीकडे भारतीय नागरिक मोबाइलपासून ते लॅपटॉपपर्यंत आणि कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत गोष्टींचा वापर करुन चीनच्या सैन्याला पैसा पुरवत असतील, असे वांगचुक म्हणाले.
हार्डवेअरबरोबरच भारतातील तरुण मुलं टीकटॉक, शेअरइट सारख्या चिनी अँपच्या वापराच्या माध्यमातून चीनला अनेक कोटींची मदत करत असतील. त्यामुळेच आपण एकत्र येऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करावी. ही मोहीम भारतासाठीही एक वरदान ठरेल. आपण हे सामान वापरणं बंद केलं तर देशातील सामान वापरुन आणि त्यामधून पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर बनू, असा विश्‍वास वांगचुक यांनी व्यक्त केला आहे. चीनने देशातील नागरिकांचा असंतोष दडपण्यासाठी यापूवीर्ही अशाप्रकारे युद्ध केल्याचे वांगचुक यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. १९६२ साली भारताबरोबर झालेल्या युद्धाआधी चार वर्षे चीनमध्ये उपासमारीची मोठी समस्या होती. त्याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी भारताशी युद्ध करुन देशातील नागरिकांना एकत्र आणल्याचे वांगचुक यांनी व्हिडीओत नमूद केले आहे. २८ मे रोजी वांगचुक यांनी अपलोड केलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून २४ तासांच्या आत या व्हिडीओला दोन लाख ६५ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

No comments:

Post a Comment